
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ‘साधना’ कंपनीत पगाराचा प्रश्न तीव्र; निम्मे कामगार कंपनी सोडून गेले
रोहा : प्रतिनिधी ( महेश मोहिते )
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात साधना कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. कामगारांना हक्काचा पगार मिळण्याऐवजी आता किती महिन्यांचा पगार बाकी आहे याचीच मोजदाद करण्याची वेळ त्यांच्यावर आली असून ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे कामगार अक्षरशः हवालदिल झाले असून अनेकांच्या संसाराचा गाडा विस्कळीत झाला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील एकूण ५० ते ६० स्टाफ व कामगारांपैकी सध्या फक्त २५ ते ३० कामगार शिल्लक राहिले आहेत. पगाराचा प्रश्न कायम असल्यामुळे जवळपास ५० टक्के कामगारांनी कंपनी सोडल्याचे समजते.
या ठिकाणी अशीही माहिती समोर येत आहे की कारखाना सुमारे ५० टक्के क्षमतेने सुरू असूनही कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित कामगारांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पगार न मिळाल्यामुळे काही कामगारांनी इतर कंपन्यांचा आधार घेतला असून काहींनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तर अनेक कामगार रोजगाराच्या शोधात महाड एमआयडीसी तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांकडे वळले आहेत. या संदर्भात कंपनी प्रशासन, मालक आणि अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेण्यात आल्या. काही बडे नेते, आमदार व खासदार यांनीही मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. मात्र इतक्या चर्चांनंतरही कामगारांच्या हातात पगार आलेला नाही, ही बाब तितकीच गंभीर ठरत आहे.त्यामुळे कंपनी प्रशासनाने दिलेला शब्द पाळत कामगारांचा थकीत पगार तात्काळ अदा करावा, अशी ठाम मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.
