
मातीने भरधाव धावणाऱ्या डंपरांचा ‘दहशतमार्ग’,लांढर ते रोहा रस्त्यावर नागरिकांचा जीव टांगणीला
. महेश मोहिते .रोहा प्रतिनिधी –
लांढर ते रोहा या मार्गावर सध्या मातीने भरलेले डंपर अक्षरशः भरधाव वेगाने धावत असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून लांढर येथून माती वाहून नेणारी जड डंपर वेगाची मर्यादा न पाळता सर्रास धावत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आखूड आणि अरुंद असलेल्या या रस्त्यावर मोठ्या वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाचा वापर लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही डंपर चालक बेजबाबदारपणे वाहन चालवत असून प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. पोलिस प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून अशा बेफाम वाहनचालकांवर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
आज प्रशासनाने डोळेझाक केली तर उद्या एखादा निष्पाप जीव गमवावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने वेग नियंत्रण, तपासणी आणि कारवाईची मोहीम राबवावी, अन्यथा उद्या काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा जाबही नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
