

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात कर-दरांमध्ये बदल; पाणीपट्टी वाढ, शवदाहिनी दरात मोठी कपात
महेश मोहिते..रोहा प्रतिनिधी
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात विविध कर व दरपत्रकात महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले असून पाणीपट्टीच्या दरात वाढ तर शवदाहिनीच्या दरात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शहरातील वार्षिक पाणीपट्टी दर पूर्वी १८०० रुपये प्रति नळजोडणी होता, तो वाढवून २८०० रुपये करण्यात आला आहे. गेल्या १६ वर्षांनंतर प्रथमच ही वाढ करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच व्यावसायिक नळजोडणी शुल्क ८००० रुपयांवरून ९००० रुपये करण्यात आले आहे.
मात्र, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शवदाहिनीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. रोहा अष्टमी शहरातील नागरिकांसाठी डिझेल शवदाहिनी शुल्क १५०० रुपयांवरून थेट ५०० रुपये करण्यात आले आहे. शहराबाहेरील नागरिकांसाठी ३००० रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. गॅस दाहिनीचे दर शहरातील नागरिकांसाठी २००० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आले असून शहराबाहेरील नागरिकांसाठी ३५०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारकांना ही सेवा मोफत देण्यात येणार आहे.
ना हरकत दाखला शुल्कातही बदल करण्यात आले आहेत. व्यवसाय ना हरकत दाखला फी २००० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आली आहे. मोठ्या व्यवसायांसाठी शुल्क १००० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आले आहे. ज्वेलर्ससाठी १५००० रुपये, हॉस्पिटलसाठी २५००० रुपये तर दवाखाना/क्लिनिकसाठी ५००० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हॉटेल व्यवसायांतर्गत छोटे हॉटेलचे शुल्क २५०० रुपयांवरून २००० रुपये करण्यात आले असून मोठ्या हॉटेलचे शुल्क १०००० रुपये कायम ठेवण्यात आले आहे. बिअर शॉपीचे शुल्क ५००० वरून १०००० रुपये, बिअर बार/परमिट रूम १५००० वरून २५००० रुपये, वाईन शॉपी २०००० वरून ३०००० रुपये, देशी दारू दुकान १५००० वरून २५००० रुपये तर ताडी-माडी विक्री केंद्र १५००० वरून २०००० रुपये करण्यात आले आहे.
कुंडलिका नदी संवर्धनासाठी १०००० रुपये अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. तसेच विविध कार्यक्रमांसाठी भाडे दर जाहीर करण्यात आले आहेत. साखरपुडा/लग्न समारंभासाठी ४५००० रुपये, फन फेअर/सभा/मेळावे ३०००० रुपये, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी १५००० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे दरही जाहीर करण्यात आले. व्यावसायिक नाटकासाठी ३५००० रुपये भाडे व १०००० रुपये सुरक्षा अनामत रक्कम, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५००० रुपये भाडे व १०००० रुपये अनामत रक्कम, तर शासकीय कार्यक्रमासाठी २०००० रुपये भाडे व १०००० रुपये अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक सभागृहासाठी तीन तासांचे भाडे ३००० रुपये कायम ठेवण्यात आले असून २००० रुपये सुरक्षा अनामत रक्कम आकारली जाणार आहे. तीन तासांनंतर प्रति तास १००० रुपये व २००० रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. विजेचा वापर प्रति युनिट २० रुपये दराने आकारला जाणार आहे.
नगराध्यक्ष शेडगे यांनी सांगितले की, शहरातील १४१ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ७००० रुपये अनुदान देण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी साबण व वॉशिंग पावडर बनवणे, ज्यूट वस्तू निर्मिती तसेच कापडावरील आरीकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सीएसआर निधीतून नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला सुमारे १० लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व टँकर वाहन प्राप्त झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शूज व स्कूल बॅग वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूणच, महसूल वाढीसाठी काही दरवाढ तर नागरिकांना दिलासा देण्यासाठी शवदाहिनी दरकपात अशा मिश्र निर्णयांमुळे हा अर्थसंकल्प चर्चेचा विषय ठरत आहे.
