
भाई पाशिलकर यांच्या कुटुंबीयांची खा. धैर्यशील पाटील यांची सांत्वनपर भेट..
रोहा : प्रतिनिधी .. महेश मोहिते.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती तसेच जिल्हा परिषदेमधील विविध खात्यांचा यशस्वी कारभार सांभाळणारे रोहा तालुक्यातील ज्येष्ठ व मुरब्बी राजकीय नेते कैलासवासी मनोहर विष्णू पाशिलकर (भाई) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पाशिलकर कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत त्यांनी भाई पाशिलकर यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली अर्पण केली.
भाई पाशिलकर हे रायगड जिल्ह्याच्या राजकारणातील अनुभवी व प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. तळागाळातील जनसामान्यांशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली होती. विविध गावांमध्ये विकासकामे राबवून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना न्याय व विकासाची दिशा मिळाली होती.
यावेळी त्यांचे सुपुत्र विनोद पाशिलकर, जे सध्या रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तसेच त्यांच्या सौभाग्यवती विजया पाशिलकर या पंचायत समिती सदस्या उपस्थित होत्या. कुटुंबीयांशी संवाद साधत खासदार पाटील यांनी दिवंगत भाई पाशिलकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमित घाग, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा भाजपाचे नगरसेवक रोशन चाफेकर, रोहा तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, धाटाव विभाग अध्यक्ष सचिन मोरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, निलेश जंगम, दीपक पवार, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस वैभव कुलकर्णी , अमर वारंगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई पाशिलकर यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
