
धाटाव औद्योगिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात; परिसर घोषणांनी दुमदुमला….
महेश मोहिते.
धाटाव येथील धाटाव औद्योगिक विद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी धाटाव हायस्कूल ते एक्सेल स्टॉपपर्यंत भव्य रॅली काढत स्वराज्याचे घोषवाक्ये देत परिसर दणाणून सोडला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा जयघोषांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले.कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि आदर्श नेतृत्वगुण यावर प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लघुनाटिका व देशभक्तीपर नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.शिवचरित्राचे जिवंत दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वसंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक हणमंत चव्हाण, जनार्दन पिंगळे, भरत वारगुडे, शिक्षिका स्मिता आव्हाड, लता मोरे, नेहा ठमके, कविता कांबळे, सुरेश भगत, राजेंद्र जाधव, संजय क्षीरसागर, प्रशांत घरत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच शिवरायांच्या आदर्शांचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
