
“आमच्याच म्हशी आम्ही कशा काय चोरणार?” वडिलोपार्जित दुग्धव्यवसायिकांचा संताप
गोरक्षण की प्रसिद्धीकरण? म्हशी जप्त प्रकरणाने खळबळ
रोहा महेश मोहिते
- वडिलोपार्जित पशुपालन व दुग्धव्यवसाय करणाऱ्या गंगाराम कोकळे यांनी पत्रकार परिषदेत पोलिस कारवाई व काही तथाकथित सामाजिक संस्थांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सुमारे ७० जनावरांचा गोठा, दररोज सुमारे ५०० लिटर दूध वितरण आणि रोहा परिसरात दूध विक्रीमध्ये नावलौकिक असतानाही स्वतःच्या दोन काळ्या म्हशी चोरीच्या असल्याचा आरोप ठेवण्यात आल्याने पशुपालक गंगाराम कोकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिनांक २८ जानेवारी रात्रौ २३:२५ च्या सुमारास पडम रेल्वे फटकाजवळ काही तथाकथित सामाजिक संघटनेच्या पोरांसह वाहन पोलिसांनी अडवून, चोरीचा आरोप ठेवण्यात आल्याने वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय करणाऱ्या कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धगडवाडी येथील गोशाळेत जनावरे ठेवण्यात आल्यामुळे त्या ठिकाणच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुमारे ७० जनावरांचा गोठा, दररोज ५०० लिटर दूध वितरण आणि स्थानिक बाजारपेठेत नियमित विक्री करणाऱ्या या व्यवसायिकांनी “अब्रुनुकसानी सहन करणार नाही” असा स्पष्ट इशारा देत मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही जण कारवाया घडवून आणत असल्याचा घणाघात करत, संबंधितांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
कोकळे म्हणाले, “जनावर सांभाळणं सोपं नसतं. आमच्या गोठ्यात असंख्य म्हशी आहेत. त्यांचे संगोपन कसे करायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. ज्यांच्याकडे एकही गाय नाही त्यांनी आम्हाला गोरक्षण शिकवू नयेत.”
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कोकळे यांनी आरोप केला की काही सामाजिक संघटना गोरक्षणाच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे उद्योग करीत असून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई घडवून आणतात. “किमान प्राथमिक तपास तरी व्हायला हवा होता. आमच्याच म्हशी आम्ही कशा काय चोरणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आम्ही कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहोत. तथापि, आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कृतींविरुद्ध आम्ही मानहानी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवत आहोत.
“तरुणांनी पशुपालन व्यवसायाकडे वळावे म्हणून मी अनेक वर्षे मार्गदर्शन करतोय. मात्र खोट्या आरोपांमुळे व्यवसायाची प्रतिमा मलिन होत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.पत्रकार परिषदेत अनेक पशुपालक व दुग्धव्यवसाय करणारे तरुण उपस्थित होते. या प्रकरणामुळे प्रशासनाची भूमिका, गोशाळा व्यवस्थापन आणि गोरक्षणाच्या नावाखाली काम करणाऱ्या संस्थांची पारदर्शकता यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
