मुंबई – अमुलकुमार जैन
भारत आणि फ्रान्समधील सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सपत्नीक मुंबई येथे दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या शिखरस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. संरक्षण, तंत्रज्ञान, हवामान बदल, नवोन्मेष आणि आर्थिक सहकार्य या विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औपचारिक स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंगळवारी महाराष्ट्र लोकभवन येथे मोदी–मॅक्रॉन बैठक होणार असून, हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण करार, अवकाश संशोधन आणि गुंतवणूक वाढविण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा असून, या भेटीत त्याला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे ‘इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ कार्यक्रमात दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक सहकार्य आणि स्टार्टअप क्षेत्रातील भागीदारीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीमुळे जागतिक पातळीवर भारताच्या राजनैतिक प्रभावाची झलक पुन्हा अधोरेखित झाली आहे. या शिखरभेटीतून दोन्ही देशांतील सहकार्याचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
