
असंघटित कामगारांसाठी सुवर्णसंधी; अलिबागमध्ये ‘श्रमयोगी मानधन’ विशेष नोंदणी शिबिर — ६० नंतर दरमहा ३ हजारांची हमी पेन्शनअलिबाग – अमुलकुमार जैन असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळावे आणि त्यांच्या भविष्यास आर्थिक हमी मिळावी या उद्देशाने अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नगरपरिषद कार्यालयात ही नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे.१८ ते ४० वयोगटातील आणि मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना दरमहा ३,००० रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याला आर्थिक आधार मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदाराला योजना पुढे सुरू ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इच्छेनुसार योजनेतून बाहेर पडल्यास जमा अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे.या विशेष मोहिमेद्वारे अलिबाग परिसरातील जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे लाभार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.अलिबाग नगरीच्या नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक,उपाध्यक्षा अॅड. सौ. मानसी संतोष म्हात्रे,मुख्याधिकारी सागर साळुंखे, , तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सुरक्षित भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलावे, असे आवाहन केले आहे. असंघटित कामगारांसाठी ही खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी ठरत असून, त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देणारी योजना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
