मतांच्या गणितापेक्षा संघर्ष मोठा;पैसा, सत्ता आणि दबावाला न जुमानता अपक्ष दीप वायडेकरांचा भुवनेश्वरमध्ये लढाऊ प्रवास
रोहा:समीर बामुगडे
भुवनेश्वर जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले पत्रकार दीप वायडेकर यांनी निकाल काहीही असो, पण आपली जिद्द, धैर्य आणि स्वाभिमान कायम ठेवला. आजच्या काळात निवडणूक म्हणजे पैसा, दबाव आणि प्रस्थापितांची मक्तेदारी बनली असताना, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे हीच मोठी धाडसाची बाब आहे. दीप वायडेकर यांनी ही धाडसाची भूमिका प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली.
मतांची संख्या अपेक्षेइतकी मिळाली नाही, हे वास्तव असले तरी त्यातून खचून न जाता त्यांनी संघर्षाची भूमिका ठामपणे कायम ठेवली. पत्रकार म्हणून काम करत असताना नेहमीच प्रस्थापित लोकांच्या विरोधात उभे राहणारे दीप वायडेकर हे नाव भुवनेश्वरमध्ये परिचित आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि सत्तेच्या आशीर्वादाने चालणाऱ्या कारभारावर त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. त्यामुळेच ते अनेक सत्ताधाऱ्यांना नडणारे ठरले.
“आज निवडणुका या पैशांच्या जोरावर चालतात. पैसे वाटल्याशिवाय मत मिळत नाहीत, हे कटू सत्य आहे. तरीही मी कोणत्याही ताकदीसमोर झुकलो नाही आणि अपक्ष म्हणून प्रामाणिक लढा दिला,” असे दीप वायडेकर यांनी सांगितले. मत कमी मिळाली म्हणून हा संघर्ष थांबणार नसून, पुढील काळातही ते याच भागात अधिक ताकदीने सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भुवनेश्वर जिल्हा परिषद क्षेत्रात आतापर्यंत काय-काय चुकीची कामे झाली, कुणाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार वाढला आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना कसा बसला, हे सर्व मुद्दे जनतेसमोर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर चालणाऱ्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवणे हीच त्यांची खरी ओळख राहिली आहे.
आज अनेक जण सत्ताधाऱ्यांच्या हाजी-हाजीमध्ये गुंतलेले असताना, दीप वायडेकर मात्र थेट त्यांच्या विरोधात उभे ठाकले. ही निवडणूक जरी जिंकली नसली, तरी निर्भीड पत्रकार आणि स्वाभिमानी नागरिक म्हणून त्यांनी लोकांच्या मनात आपली ठाम छाप उमटवली आहे. भुवनेश्वरच्या राजकारणात हा संघर्ष भविष्यात अधिक तीव्र होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
