

पड रं पाण्या कर पाणी पाणी..!’ रोह्यात पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत
पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; भातशेतीला पाण्याची प्रतीक्षा पीक पिकलंच नाही तर खायचं काय?
रोहा प्रतिनिधी … महेश मोहिते.
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांना पाण्याची कमतरता जाणवू लागली असून, काही ठिकाणी जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढल्याने पिकांवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून आता आर्तपणे ‘ये रे ये रे पावसा... अशी हाक ऐकू येत आहे.
रोहा तालुक्यात यंदा सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय १७० हेक्टरवर नाचणी, १५ हेक्टरवर वरी, तर १५ ते २० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. धाटाव, चणेरा, न्हावे, कोकबन, घोसाळे, विरजोळी, सुतारवाडी, धामणसई, पिंगळसई, देवकान्हे, खांब, कोलाड यांसह तालुक्यातील अनेक गावं, विभागात आणि वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.
सध्या भात पीक दाणा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. विशेषतः वरकस भागातील भातशेतीला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस झाला नाही, तर भाताच्या दाणा भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
रोहा तालुक्यात अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर शेती घेऊन पीक घेतात. बियाणे, खते, मजुरी, मशागत आणि इतर खर्च करून त्यांनी पीक उभे केले आहे. मात्र ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने पाठ फिरवल्याने या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पाऊस न झाल्याने पीक हातचे गेले, तर केलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पीक पिकलंच नाही तर खायचं काय?’ हा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी आगामी काही दिवस निर्णायक ठरणार असून, पावसाने आणखी दडी मारल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी
पावसाअभावी निर्माण होणाऱ्या परिस्थितीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत, मार्गदर्शन आणि उपलब्ध उपाययोजनांची माहिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषांनुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी महादेव अरे यांनी सांगितले की, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात लागवड झाली आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून पाऊस झालेला नाही. पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास विशेषतः वरकस भागातील भात पिकाला दाणा भरण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आगामी काळातील पाऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
दरम्यान, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रोह्यातील शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच आशा आहे—‘ये रे ये रे पावसा…
