वरसे ग्रामपंचायत हद्दीतील ‘ब्लू लाईन’मधील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करा; पत्रकार समीर बामुगडे यांची आक्रमक भूमिका
रोहा:प्रतिनिधी
वरसे ग्रामपंचायत हद्दीत पूररेषा (ब्लू लाईन) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे उभारली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पत्रकार समीर बामुगडे यांनी लावून धरली आहे. पूर रेषेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नदीपात्राच्या जवळ असलेल्या ‘ब्लू लाईन’ म्हणजेच पूररेषा क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे कायमस्वरूपी बांधकाम करण्यास शासकीय नियमांनुसार सक्त मनाई आहे. असे असतानाही वरसे ग्रामपंचायत हद्दीत नियम धाब्यावर बसवून अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. “या संपूर्ण गैरव्यवहारात स्थानिक अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांची मिलीभगत तर नाही ना?” असा थेट संशय आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पूररेषेच्या व्याख्येत फेरफार करून किंवा नियमांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत परवानग्या दिल्या गेल्या का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पत्रकार समीर बामुगडे यांनी प्रशासनाच्या या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता या हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामांवर सरसकट आणि निष्पक्ष कारवाई केली पाहिजे. अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात दाखवलेली हेळसांड खपवून घेतली जाणार नाही,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच, अशा भ्रष्ट व निष्काळजी कारभाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘किड फवारणी’ करून प्रशासन पूर्णपणे साफ करण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
पावसाळ्यात पूररेषेत झालेल्या बांधकामांमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊन संपूर्ण वरसे परिसरात आणि रोहा शहरात भीषण पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक व जिवित नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे रोहा तालुका प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि वरसे ग्रामपंचायतीने या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पूररेषेतील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर तत्काळ बुलडोझर फिरवून दणकेबाज कारवाई करावी, अशी ठाम भूमिका समीर बामुगडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
