

पिंगळसईत ‘साखरचौथीच्या बाप्पा’चे जल्लोषात आगमन
‘पिंगळसईचा सम्राट’ गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना जाणता राजा मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाचे १२वे वर्ष
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
पिंगळसई येथील दत्त आळीतील जाणता राजा मित्रमंडळाच्या ‘पिंगळसईचा सम्राट’ या साखरचौथीच्या बाप्पाचे आज ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. श्री गणेशाच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाचे मंडपात आगमन झाल्यानंतर श्री. सतीश मोहिते यांच्या सपत्नी हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाणता राजा मित्रमंडळ, दत्त आळी-पिंगळसई यांच्या साखरचौथ गणेशोत्सवाचे यंदा १२वे वर्ष आहे. मंडळातील तरुणांनी एकजुटीने गणरायाच्या आगमनापासून प्रतिष्ठापनेपर्यंतचे सर्व नियोजन केले. आकर्षक सजावट, पूजा-अर्चा आणि भाविकांसाठी आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली आहे. गेल्या बारा वर्षांपासून मंडळाकडून हा उत्सव भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा केला जात आहे. उत्सवाच्या पुढील दिवसांत धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, भाविकांनी ‘पिंगळसईचा सम्राट’ गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
