

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल व भुवनेश्वर येथील जय गणेश मित्रमंडळाचा जिल्हा शासकीय रक्तकेंद्राकडून गौरव
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल तसेच भुवनेश्वर येथील जय गणेश मित्रमंडळाचा जिल्हा शासकीय रक्तकेंद्र, अलिबाग यांच्यातर्फे गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्त्वाचा दुवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजात रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ५० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केल्याची नोंद जिल्हा शासकीय रक्तकेंद्राच्या गौरवपत्रात करण्यात आली आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत जिल्हा शासकीय रक्तकेंद्र, अलिबाग व जिल्हा रुग्णालय रायगड यांच्या वतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी “रक्तदान करा, दरवेळी करा, नियमित करा” असा संदेश देत निरोगी व पात्र नागरिकांनी रक्तदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व मोठे असून आयोजकांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी रोटरी क्लब रोहा सेंट्रल अध्यक्ष लक्ष्मण मोरे, जय गणेश मित्र मंडळ अध्यक्ष नितीन माने, उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे डायरेकटर तसेच रोहा नगरपरिषद सभापती मयूरजी दिवेकर, प्रेसिडेंट ईलेक्ट रो.राकेश कागडा, रो. विजय दिवकर, रो. निखिल दाते, रो. राम नाकती,रो. रुपेश पाटील,रो. दिलीप देशमुख, रो. दिपक सिंग, खजिनदार रो. रुपेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दिपक गोसावी व सर्व टीमने उत्तम सहकार्य केले.
