



दमखाडीतील जयराम बिल्डिंग गटाराचा तिढा; नगरपरिषद की सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी? व्यावसायिक उद्ध्वस्त — दिपिका ताई चिपळूणकर आक्रमक!
रोहा:समीर बामुगडे,
रोहा येथील दमखाडी परिसरातील जयराम बिल्डिंग समोरील गटाराचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत गंभीर बनला आहे. गटाराचे काम नेमके कोणाचे? नगरपरिषदेचे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD)? यावरून दोन्ही प्रशासकीय विभागांमध्ये जुंपली आहे. एक विभाग दुसऱ्यावर बोट दाखवून मोकळा होतोय, तर दुसरा विभाग पहिल्याकडे जबाबदारी ढकलतोय. या सरकारी अनास्थेमुळे आणि अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक मात्र नाहक भरडले जात आहेत.
या गटाराच्या दुरवस्थेमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्ता खड्ड्यात गेला आहे. जयराम बिल्डिंगमध्ये मोठे गाळेभाडे भरून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनी या भागातील दुकानांकडे पाठ फिरवल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. दरमहा मोठे भाडे आणि इतर खर्च भागवणे दुकानदारांना अशक्य झाले असून छोटे व्यावसायिक थेट आर्थिक संकटात सापडले आहेत.
या गंभीर समस्येवर दीपिका चिपळूणकर आक्रमक झाल्या असून त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या पोटापाण्याशी होणाऱ्या खेळाविरोधात त्यांनी थेट मैदानात उतरून तीव्र संताप व्यक्त केला. “नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापतील भांडणे आणि कागदी घोडे नाचवणे बंद करून तात्काळ गटाराचे काम सुरू करावे,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत काम प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत दीपिकाताई चिपळूणकर यांनी आंदोलनाचा निर्धार बोलून दाखवला आहे.
