

वरसे उध्वस्त करणाऱ्यांवर महसूल विभाग बुलडोझर फिरवणार का?चोर अधिकारी अन् पुढाऱ्यांची मिलीभगत
रोहा समीर बामुगडे
वरसे गावात अनधिकृत वाढीव बांधकामांचा पूर आलाय आणि याला कारणीभूत आहेत इथले भ्रष्ट अधिकारी आणि स्वार्थी पुढारी. नियमांची उघडपणे पायमल्ली करून उभारलेल्या या बांधकामांवर महसूल विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्यांमधून होत आहे.
गावात गल्लीबोळात बेकायदेशीर बांधकामे उभी राहत आहेत. नैसर्गिक पाण्याचे मार्ग आणि नाले बुजवून अतिक्रमणे केली जात आहेत. हे सगळं पैशांच्या हव्यासापोटी चाललं असून, जनतेच्या जीवाशी खेळणारे इथले पुढारी आणि डोळेझाक करणारे अधिकारी थेट ‘चोर’ आहेत, असा उघड आरोप नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात वरसे गावात जो पाण्याचा वेढा पडतो आणि पूर येतो, त्याला हीच अनधिकृत बांधकामे जबाबदार आहेत. थोडक्यात सांगायचे तर, वरसेकरांना पुराच्या दाढेत ढकलणारे खरे मारेकरी हेच अधिकारी आणि पुढारी आहेत.
उद्या गावात पुरामुळे किंवा आपत्तीमुळे कोणाचेही नुकसान झाले, तर त्याची पूर्ण भरपाई या अधिकारी आणि पुढाऱ्यांकडूनच वसूल केली पाहिजे. गावात काहीही अघटित घडल्यास संतप्त जनता गप्प बसणार नाही, थेट या पुढाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन उत्तर मागेल.
संपूर्ण वरसे गाव उध्वस्त करायला निघालेल्या या भ्रष्ट टोळीवर महसूल विभाग कधी कारवाई करणार आणि हे बेकायदेशीर बांधकाम कधी पाडणार, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
