
कामगाराचा बळी; भरपाईसाठी दोन ठेकेदारांची ढकलाढकली
रोहा प्रतिनिधी ..(महेश मोहिते )
महावितणाच्या विद्युत वाहिनीवर काम करताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेला कंत्राटी कामगार पंकज मढवी याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर रविवारी पहाटे दोन वाजता संपली. १ सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. गरीब कामगाराचा जीव गेला असला तरी नुकसानभरपाईसाठी दोन ठेकेदारांनी एकमेकांवर ढकलाढकली सुरू केली आहे.
पंकज मढवी ज्या कंत्राटदाराकडे काम करत होता त्या श्रीराम एंटरप्रायझेस, बेलापूर यांचा कर्मचारी पुरवठ्याचा ठेका ३१ ऑगस्ट रोजी संपला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून कर्मचारी पुरवठ्याचा ठेका शगून गार्ड सिक्युरिटी एजन्सी, पवई यांना मिळाला. याच दिवशी पंकज मढवी याचा अपघात झाला. आता या दुर्दैवी मृत्यूची जबाबदारी घेण्यास दोन्ही ठेकेदारांनी हात वर केले आहेत. कर्मचारी पुरवठ्याचा ठेका बदलण्याच्या संक्रमणकाळात पंकज मढवी याच्याकडून नेमके कोणाच्या आदेशाने काम करून घेण्यात आले, त्याला विद्युत वाहिनीवर काम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण होते का, सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का, विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद करूनच काम सुरू करण्यात आले होते का, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरीवले यांनी उपस्थित करून पंकजच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
सखोल चौकशी करा-
पंकज मढवीच्या मृत्यूनंतर कंत्राटदारांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असेल तर हा प्रकार संतापजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून अपघातास जबाबदार अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी. जर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तुषार खरीवले यांनी दिला आहे.
