

वीजपुरवठा खंडित असतानाही महावितरण कर्मचाऱ्याला विजेचा धक्का; रोह्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
*रोहा : प्रतिनिधी … महेश मोहिते.
रोहा तालुक्यात महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मंगळवारी घडली. तांत्रिक कामासाठी रोहा तालुक्यासह परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना महावितरणकडून देण्यात आली होती. मात्र, वीजपुरवठा खंडित असतानाही विद्युत पोलावर काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याने नागरिकांमध्ये सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
रोहा शहरातील वर्धमान दर्शन इमारतीच्या आवारातील विद्युत पोलवर काम करत असताना महावितरणचा कर्मचारी पंकज मढवी (रा. निडी, नागोठणे) याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र पंकज मढवी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.
दरम्यान, नियोजित तांत्रिक कामासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असताना विद्युत पोलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का नेमका कशामुळे लागला, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यासोबतच संबंधित विद्युत वाहिनीची सुरक्षितता तपासणे, आवश्यक खबरदारी घेणे आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.या दुर्घटनेची महावितरण प्रशासनाकडून सखोल चौकशी करून विजेचा धक्का लागण्यामागील नेमके कारण स्पष्ट करावे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
