

श्रद्धेने दर्याला नारळ अर्पण; रोहा तालुक्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह
रोहा : प्रतिनिधी.. महेश मोहिते.
रोहा तालुक्यातील खारापटी व कुंभोशी कोळीवाडा वगळता रोहा तालुक्यातील सर्व कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ढोल ताशे व सनईच्या सुरात सर्व कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात कोळी गीतांच्या तालावर साजरा केला. समुद्राशी अतूट नाते असलेल्या कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून त्यांच्या जीवनाशी आणि उदरनिर्वाहाशी जोडलेली श्रद्धेची परंपरा आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव व भगिनींनी समुद्रकिनारी एकत्र येत खवळलेल्या दर्याची विधिवत आरती केली. त्यानंतर सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करून, “हे दर्या सागरा, आमच्या धन्याची नौका सुखरूप समुद्रात जाऊ दे आणि त्याला सुखरूप घरी परत आण,” अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. पूर्वजांपासून चालत आलेल्या श्रद्धेनुसार समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर दर्या शांत होतो आणि त्यानंतर मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करण्याची तयारी केली जाते.मात्र, खारापटी आणि कुंभोशी या दोन कोळीवाड्यातील वातावरण यंदा वेगळे होते. या दोन्ही गावांनी आपल्या दोन तरुण कोळी बांधवांना तरुण वयातच गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत येथील कोळी बांधव व भगिनींनी उत्सवी स्वरूपाला फाटा देत साधेपणाने नारळ दर्याला अर्पण केला.
दुःखाच्या छायेतही पूर्वजांची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न समुद्राशी असलेले कोळी समाजाचे भावनिक नाते आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करणारा ठरला.
