
रोहे बायपासची साईडपट्टी बनली वाहनतळ ?
दिवस-रात्र उभ्या वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न; अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ?
रोहे : प्रतिनिधी… महेश मोहिते.
शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि शहरातून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, या उद्देशाने असलेल्या रोहे बायपास मार्गाच्या साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील तसेच शहराबाहेरील अनेक चारचाकी व इतर वाहने या रस्त्याचा कडेला तासन्तास, तर काही वेळा दीर्घकाळ उभी राहत असल्याने बायपासची साईडपट्टी जणू अनधिकृत वाहनतळ बनत चालली आहे. बायपाससारख्या मार्गावर वाहनांचा वेग तुलनेने अधिक असतो. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला आणि साईडपट्टीवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरून अथवा मागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यास किंवा उभ्या वाहनांना योग्य रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट नसल्यास गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. केंद्रीय मोटार वाहन (ड्रायव्हिंग) नियमावली, २०१७ मधील पार्किंगसंबंधी तरतुदींनुसार वाहतुकीला अडथळा किंवा इतरांना गैरसोय होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करता येत नाही. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १२२ मध्येही सार्वजनिक ठिकाणी वाहन अशा स्थितीत उभे ठेवण्यास मनाई आहे की ज्यामुळे इतरांना धोका, अडथळा किंवा अनावश्यक गैरसोय होऊ शकते.
विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही अलीकडे राष्ट्रीय महामार्गांवरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे अधोरेखित केले आहे. NHAI ने अशा अनधिकृत पार्किंगविरोधात कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले असून रस्त्यावरील वाहतूक विनाअडथळा ठेवण्यावर भर दिला आहे.
मात्र रोहे बायपासवरील परिस्थिती पाहता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ही वाहने नियमितपणे येथे का उभी केली जात आहेत ? त्यांच्यासाठी अधिकृत पार्किंगची व्यवस्था आहे का ? दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांची वाहतूक पोलीस अथवा संबंधित यंत्रणेकडून तपासणी केली जाते का ? तसेच साईडपट्टीचा वापरच पार्किंगसाठी होऊ लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत वाहन बाजूला घेण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध राहणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
रोहे शहराचा विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने या समस्येकडे केवळ दंडात्मक कारवाईच्या दृष्टीने न पाहता स्वतंत्र आणि अधिकृत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनेही विचार करणे गरजेचे आहे. मात्र तोपर्यंत बायपासच्या साईडपट्टीवर वाहतुकीला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी राहत असतील तर वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि संबंधित रस्ता प्राधिकरणाने संयुक्त पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोका आधीच ओळखून अनधिकृत पार्किंगला आळा घालणे अधिक महत्त्वाचे आहे. रोहे बायपास हा वाहतुकीसाठी आहे की वाहनांच्या पार्किंगसाठी, याचे उत्तर आता संबंधित प्रशासनानेच द्यावे.
