


जनरल मजदूर सभेच्या वतीने कामगार कायद्यावरील प्रशिक्षण शिबिर
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
जनरल मजदूर सभा, ठाणे यांच्या वतीने रोहा औद्योगिक वसाहतीतील कायमस्वरूपी, कंत्राटी व हंगामी कामगार तसेच एक्झिक्युटिव्ह आणि ऑफिसर्ससाठी कामगार कायद्यावरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आर.व्ही. फार्म, श्री. हेमंत कांबळे यांच्या फार्म हाऊस येथे निसर्गरम्य वातावरणात हे शिबिर उत्साहात पार पडले.यावेली कामगार नेते स्व.सूर्याकांत वढावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून
प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.शिबिरात कामगार कायदे, कामगारांचे हक्क, वेतन, कामाचे तास, ओव्हरटाईम, कंत्राटी कामगारांचे अधिकार, सामाजिक सुरक्षा, पीएफ, ईएसआय, ग्रॅच्युइटी तसेच कामगार संघटनांचे अधिकार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कामगार नेते संजय वढावकर यांनी कामगार कायद्यांचा सखोल अभ्यासपूर्ण आढावा घेत, विविध कायदेशीर तरतुदी कामगारांना सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितल्या. कामगारांना मिळालेले हक्क अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि बलिदानातून प्राप्त झाले असून, नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांवर होणारे संभाव्य परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. अनिरुद्ध कोयंदे यांनी स्टँडिंग ऑर्डर्स, जुने व नवीन कामगार कायदे आणि त्यातून कामगारांसमोर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जनरल मजदूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी प्रास्ताविक केले, तर सुहास खरीवले यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिरास रोहा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमधील मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक नायट्रेट, सोयस्को, निलिकॉन, एफडीसी, कोरस, युनिकेम कॉन्ट्रॅक्टर लेबर, बेक केमिकल कंपनीतील कामगार तसेच सर्व कमिटी सदस्यांनी सहकार्य केले.
