


महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविणार – मंत्री आदिती तटकरे
‘मुलींना दोष देण्यापेक्षा मुलांमध्ये सुसंस्कार रुजवा’; उद्योग मंथन व सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
अंकुर शहर वस्तीस्तर संघ, रोहा संचालित रोहा शहर उपजीविका केंद्राच्या वतीने आयोजित उद्योग मंथन व सांस्कृतिक कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी महिला सक्षमीकरण, समानता आणि स्वावलंबनाचा प्रभावी संदेश दिला. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, शहरातील महिला बचत गटांसाठी आगामी काळात आणखी अनेक योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मार्गदर्शन करताना ना. तटकरे म्हणाल्या की, अशा कार्यक्रमांमधून महिलांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व ओळखण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. “जन्म देणाऱ्या आईचे नाव लावण्यात कमीपणा कसला? आई-वडील, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव नसून जीवनात आईचेही तेवढेच महत्त्व आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
समाजातील बदलत्या मानसिकतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, मुलगी उशिरा घरी आली तर तिलाच दोष देण्याऐवजी मुलांमध्ये महिलांप्रती आदर, संवेदनशीलता आणि सुरक्षिततेचे संस्कार रुजविण्याची गरज आहे. “रस्त्यावर एखादी मुलगी उशिरा दिसली तर तिला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी मुलांनी स्वीकारावी,” असा सामाजिक संदेशही त्यांनी दिला.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देताना त्यांनी श्रावण महिन्यातील विविध सणांसाठी लागणारे साहित्य महिला बचत गटांनी तयार करून विक्रीस आणावे, असे आवाहन केले. अष्टमी येथील स्टिचिंग युनिटच्या धर्तीवर आणखी एक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त करत महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
“जी आनंदाची क्षणे आयुष्यात अनुभवता आली नाहीत, त्यांचा आता मनमुराद आनंद घ्या. स्वतःसाठी जगा, आत्मविश्वासाने पुढे या आणि स्वावलंबी बना,” असे प्रेरणादायी आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी रोहा अष्टमी शहरातील 12 बचत गटातील महिलांनी आषाढी वारी, कोळी, आदिवासी यासह अन्य नृत्य प्रकार सादर केले. यामध्ये प्रथम क्रमांक
यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, सभापती नीता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, नगरसेविका स्नेहा आंब्रे, पूर्वा मोहिते, अफ्रिन रोगे, संजना शिंदे, सुप्रिया जाधव, अल्मास मुमेरे, प्रियांका धनावडे तसेच माजी नगरसेविका समीक्षा बामणे, सुजाता चाळके, सारिका पायगुडे आणि शहरातील महिला बचत गटांच्या मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होत्या.
