

रोहा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; २५ कोटींच्या निधीतून आधुनिक सुविधांनी सजणार स्थानक
खासदार सुनील तटकरे यांची पाहणी; १ ते २ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात, रायगडातील १५ स्थानकांना मान्यता
रोहा : प्रतिनिधी (महेश मोहिते)
कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या रोहा रेल्वे स्थानकाचा लवकरच संपूर्ण कायापालट होणार असून, तब्बल २५ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानकाचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी रोहा रेल्वे स्थानकाला भेट देत संबंधित अधिकारी, रेल्वे प्रशासन आणि आर्किटेक्ट यांच्यासोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्थानकाच्या नवीन आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त प्रतीक्षागृह, दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था, आधुनिक स्वच्छतागृहे, पार्किंग, सुशोभीकरण तसेच स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपणारी रचना यांचा समावेश असणार आहे. स्थानकाचा संपूर्ण परिसर आधुनिक आणि प्रवासी-अनुकूल करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील एकूण १५ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मान्यता मिळाली असून, त्यामध्ये रोहा आणि पेण रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर २ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी पेण रेल्वे स्थानकाच्या विशेष संकल्पनेचीही माहिती देण्यात आली. पेण हे जगभर प्रसिद्ध गणेशमूर्ती निर्मितीचे केंद्र असल्यामुळे तेथील रेल्वे स्थानकाची रचना गणेशमूर्ती कलेचा वारसा जपणाऱ्या थीमवर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकाला सांस्कृतिक ओळखही प्राप्त होणार असल्याचे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.
रोहा रेल्वे स्थानकासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक इतिहास, परिसराची ओळख आणि आधुनिक वास्तुरचनेचा समन्वय साधण्यात आला असून, हा आराखडा आर्किटेक्ट यांनी खासदार तटकरे यांच्यासमोर सादर केला. त्यातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक सूचना देखील देण्यात आल्या.
तसेच, रोहा रेल्वे स्थानकाच्या कामाची प्राथमिक प्रक्रिया येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या याशिवाय, रोहा रेल्वे स्थानकाबाहेर सध्या उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नवीन आराखड्यात विशेष नियोजन करण्यात आले आहे. स्थानक परिसरात एकाच वेळी सुमारे ५० ते ६० रिक्षा व्यवस्थित उभ्या राहू शकतील, अशा स्वतंत्र रिक्षा पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा सहज उपलब्ध होतील, तसेच स्थानकाबाहेरील वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच रोहा शहराच्या विकासालाही मोठी चालना मिळणार असून, स्थानकाला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे
