
भातसईचे आदर्श पोलीस पाटील संकेत कोतवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली; राज्य पोलीस पाटील संघाकडून कुटुंबीयांचे सांत्वन व आर्थिक मदत
महेश मोहिते..रोहा प्रतिनिधी..
तालुक्यातील भातसई गावचे आदर्श पोलीस पाटील तथा सर्वांचे जिवलग सहकारी कै. संकेत कोतवाल (वय ३१) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस पाटील संघटना व परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे गावासह रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील बांधवांनी हळहळ व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाच्या वतीने कोतवाल यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संघटनेच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द करून या कठीण प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.
यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा सचिव कुणाल लोंढे पाटील, रोहा तालुकाध्यक्ष यशवंत जंगम पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष नरेश म्हात्रे पाटील, खेड तालुका अध्यक्ष दिपक पावडे पाटील, सचिव गौतम लोखंडे पाटील, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बळीराम गायकवाड पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर डायरे पाटील, जिल्हा खजिनदार रविंद्र अहिरे पाटील तसेच एकनाथ पाटील, शेखर तरे पाटील, मंगेश पाटील, श्रीधर घोडमोड पाटील, संतोष आंब्रे पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.
कै. संकेत कोतवाल यांनी पोलीस पाटील म्हणून गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचे सांगत सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
उपस्थितांनी ईश्वरचरणी प्रार्थना करत कै. संकेत कोतवाल यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी श्रद्धांजली अर्पण केली.
