
रोहा पोलिसांची प्रभावी तपासकामगिरी; चोरीतील ११ प्रकारचे सोन्याच्या दागिन्यांचा फिर्यादीस परतावा
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
गुन्ह्याचा वेगवान आणि शास्त्रोक्त तपास करत चोरीला गेलेले सुमारे ११ प्रकारचे सोन्याचे दागिने हस्तगत करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादीच्या ताब्यात देण्याची उल्लेखनीय कारवाई रोहा पोलिसांनी केली आहे. या कार्यवाहीमुळे रोहा पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.रोहा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्र. ८५/२०२४ मधील चोरीच्या प्रकरणाचा कसून तपास करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या गुन्ह्यातील तपासादरम्यान चोरीस गेलेले सुमारे २ लाख ४६ हजार रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.या प्रकरणातील फिर्यादी सचिन अशोक पिंगळे (रा. रोहा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी रहानवाज इकराम कुरेशी, शमीम इस्लाम कुरेशी आणि हिना रहानवाज कुरेशी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार १५ जुलै २०२६ रोजी फिर्यादी यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिनीत शिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून मुद्देमाल हस्तगत केला.गुन्ह्याचा छडा लावून चोरीस गेलेला ऐवज मूळ मालकास परत मिळवून देण्यात यश आल्याने फिर्यादीने रोहा पोलिसांचे आभार मानले असून, या कारवाईचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे.
