


*ताकीद धाब्यावर; रोहा उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात, नागरिकांमध्ये संताप*
(*आंदोलकांच्या मागण्यांना केराची टोपली* )
रोहा :प्रतिनिधी.( महेश मोहिते)
रोहा रेल्वे उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातात संकेत कोतवाल या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान पंचायत समिती सदस्य सुरेश मगर आणि मृत तरुणाचे मामा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नंदकुमार म्हात्रे यांनी उड्डाणपूल प्रकल्पाचे अभियंता ओमकार म्हात्रे यांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली होती. “जोपर्यंत पर्यायी रस्ता पूर्णपणे सुरक्षित व वाहतुकीस योग्य केला जात नाही, तोपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करू नये,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आंदोलनावेळी देण्यात आलेल्या या स्पष्ट सूचनेकडे दुर्लक्ष करत आंदोलकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये पुन्हा नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व संबंधित यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ता अद्यापही अनेक ठिकाणी धोकादायक असून वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित झालेला नाही. अशा परिस्थितीत उड्डाणपुलाचे काम सुरू केल्यास वाहतूक कोंडी वाढण्याबरोबरच आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांचे पालन करण्यात यावे आणि रस्ता पूर्णपणे दुरुस्त करूनच उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा केली आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
