
जनतेच्या सुरक्षेसाठी झटणारे ‘दोन सिंहम’ चर्चेत; सोशल मीडियावर IAS तुकाराम मुंडे आणि DCP अतुल झेंडे यांच्या कामगिरीचे कौतुक
रायगड – अमुलकुमार जैन
महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या यादीत गणले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे आणि कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. जनतेच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव करणारे एक आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पोस्टरमध्ये एका बाजूला अन्न व औषध प्रशासनातील (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंडे यांची छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा माफिया आणि बेकायदेशीर व्यावसायिकांवर त्यांनी केलेल्या कठोर कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची ‘धडाकेबाज अधिकारी’ अशी ओळख निर्माण झाली आहे.दुसऱ्या बाजूला कल्याण विभागाचे डीसीपी अतुल झेंडे यांना स्थान देण्यात आले आहे. गुंडगिरी, अवैध धंदे आणि समाजकंटकांविरोधात त्यांनी राबविलेल्या मोहिमा तसेच नागरिकांच्या सुरक्षेला दिलेले प्राधान्य यामुळे त्यांची प्रतिमा एक कडक आणि परिणामकारक पोलीस अधिकारी म्हणून तयार झाली आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या कारवायांचा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.“एकाच ध्येयासाठी, जनतेच्या सुरक्षिततेसाठी” असा संदेश देत दोन्ही अधिकाऱ्यांना “खऱ्या अर्थाने सिंहम” असे संबोधण्यात आले आहे. तसेच “महाराष्ट्राला असेच निर्भय, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी हवे आहेत” असे मतही पोस्टरमधून व्यक्त करण्यात आले आहे.सोशल मीडियावर या पोस्टरवर विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. काहींनी तुकाराम मुंडे यांच्या प्रशासनातील धाडसी निर्णयांचे समर्थन केले, तर काहींनी अतुल झेंडे यांच्या गुन्हेगारीविरोधातील मोहिमांचे स्वागत केले आहे.दरम्यान, नागरिकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारे आणि कोणत्याही दबावाला न जुमानता काम करणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे पोस्टर केवळ दोन अधिकाऱ्यांचा गौरव करणारे नसून, प्रामाणिक आणि लोकाभिमुख प्रशासनाची जनतेची अपेक्षा अधोरेखित करणारे ठरत आहे.
