

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा
रायगड – अमुलकुमार जैन
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या समवेत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी व कामकाजाशी संबंधित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आणि विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत डिसेंबर २०२५ पर्यंतचे अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रिया, पदोन्नती, अधिसंख्य पदांची सद्यस्थिती, निलंबन प्रकरणे, पेन्शन प्रकरणे तसेच कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वैद्यकीय बिले वेळेत अदा करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याशिवाय सेवा वर्ग कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करून देणे, ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे, तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे आणि शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्तींमार्फत कामकाज होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.पुरवठा विभागात कार्यरत महसूल कर्मचाऱ्यांना ऐच्छिक ठिकाणी बदली मिळावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल (सीआर) वेळेत लिहिले जावेत तसेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा, यासंदर्भातही चर्चा झाली. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे, दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना जागा उपलब्ध करून द्यावी तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघासाठी कार्यालयीन जागा देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.याशिवाय ‘अ’ प्रमाणपत्र वितरण, सेवाअंतर्गत परीक्षांसाठी पूर्वतयारी मार्गदर्शन, हिंदी-मराठी परीक्षेतील सूट, कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देणे यांसारखे विषयही चर्चेला घेण्यात आले. ऐनवेळी उद्भवलेल्या विविध कर्मचाऱ्यांच्या समस्यांवरही प्रशासनासमोर मते मांडण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात सहभागी झालेल्या विविध पथकांना अद्याप मानधन मिळाले नसल्याचा मुद्दा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा विषयही बैठकीत चर्चेस घेण्यात आला.बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईथल, मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड तसेच विविध विभागांतील कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
