

रोहा उड्डाणपूल प्रश्न: ‘छावा क्रांतिवीर सेना’ व रिक्षा संघटनेने महा रेल प्रशासनाला घेरले; मागण्या मान्य करण्याचे जी. एम.चे आदेश
*महेश मोहिते *रोहा (प्रतिनिधी):**
रोहा रेल्वे गेट जवळ सध्या सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवरून छावा क्रांतिवीर सेना संघटना आणि श्री धावीर महाराज रोहा रिक्षा चालक-मालक संस्था आक्रमक झाली आहे. या संदर्भात आज घाटकोपर येथे असलेल्या महा-रेलच्या कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महा रेलचे अधिकारी श्रीकांत साहेब महाव्यवस्थापकांची (जीएम) प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल घेत जीएम साहेबांनी संबंधित अधिकारी ओमकार म्हात्रे सरांना तात्काळ कामात सुधारणा करण्याचे आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने खालील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या:
कामाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे.
योग्य ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसवण्यात यावे आणि रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह (चमकणारे) सूचनाफलक लावण्यात यावेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ ‘ऑर्डन बॉय’ (सुरक्षा रक्षक/ट्रॅफिक वॉर्डन) तैनात करण्यात यावेत.
रेल्वे फाटक बंद असताना नागरिकांच्या सोयीसाठी मोरी खालचा जो पर्यायी मार्ग आहे, त्याचे व्यवस्थित रित्या काँक्रिटीकरण करून तो मार्ग सुसज्ज करण्यात यावा.
शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्या अत्यंत वाजवी आणि गंभीर असल्याने, महाव्यवस्थापकांनी (जीएम) याची तात्काळ दखल घेतली. त्यांनी उपस्थित असलेले अधिकारी ओमकार म्हात्रे यांना विलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करायला सांगितले असून, नागरिकांना होणारा त्रास तात्काळ दूर करून या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या प्रसंगी महा रेल प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेवेळी छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री धावीर महाराज रोहा रिक्षा चालक-मालक संस्थेचे उपाध्यक्ष व पत्रकार रुपेंद्र मळेकर आणि रोहा तालुका छावा क्रांतिवीर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक चोरगे यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असल्या तरी या कामावर संघटनेचे बारीक लक्ष राहील, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
