



रोहा उड्डाणपूल कामामुळे जनतेचा संताप अनावर; छावा क्रांतिवीर सेनेचा आंदोलनाचा इशारापनवेल
रायगड दि .28 ( सुरेश तांडेल )
रोहा रेल्वे स्थानक परिसरातील फाटकाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामामुळे नागरिक, वाहनचालक, रिक्षाचालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत विविध सामाजिक, पत्रकार आणि स्थानिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महा रेल प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. कामाचे नियोजन अत्यंत ढिसाळ पद्धतीने करण्यात आल्याने परिसरात दररोज तीव्र वाहतूक कोंडी होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उड्डाणपूलासाठी मूळ रस्ता खोदून ठेवण्यात आला असून पर्यायी रस्त्याची कोणतीही सक्षम व्यवस्था करण्यात आलेली नाही. उपलब्ध पर्यायी मार्ग अत्यंत अरुंद, खड्डेमय व धुळीने भरलेले असल्याने दुचाकीस्वारांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक दुचाकीस्वार खराब रस्त्यामुळे घसरून पडत असून काहींना दुखापती देखील झाल्या आहेत. या अपघातांना जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगण्यात आले आहे.अनेक वेळा मालवाहू वाहने रस्त्यात अडकून वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असून काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षक किंवा वाहतूक वॉर्डन नियुक्त करण्यात आले नसल्याने अपघातांची शक्यता वाढली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर महा रेल प्रशासनाकडे पर्यायी रस्त्याचे काँक्रिटीकरण, दुचाकी व रिक्षांसाठी सुरक्षित मार्ग, वाहतूक वॉर्डन नियुक्ती, सुरक्षा उपाययोजना, धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी तसेच योग्य वाहतूक नियोजन करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष रुपेंद्र मळेकर यांनी दिला आहे.हे निवेदन रायगड जिल्हा प्रमुख रोशन पवार, सचिव श्रीयश ठोकल, उपाध्यक्ष रुपेंद्र मळेकर, कार्याध्यक्ष विशाल देशमुख, संपर्क प्रमुख स्वप्नील घरत, संघटक राजेश रसाळ, सरचिटणीस प्रथमेश कोळी, सदस्य संग्राम भोपी, उपसंपादक योगेश मुकादम, रोहा तालुका अध्यक्ष सुहास कारभारी तसेच अशोक चोरगे, समुद्र चोरगे, दीपक खेरटकर, अजय ताडकर, सौरभ पोकळे, नितेश मळेकर, निखिल मळेकर, प्रशांत चोरगे, सोमेश्वर पोकळे, विनोद चोरगे, प्रवीण पोकळे, अमोल पाटील आणि आकाश दळवी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले आहे.
