

रायगड जिल्ह्यात भाडेकरू पडताळणी अभियान राबविण्याची छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख स्वप्नील घरत यांची मागणीपनवेल –
रायगड दि. 25 ( सुरेश तांडेल )
रायगड जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येसोबत विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरू वास्तव्यास राहत असून अनेक ठिकाणी कोणतीही अधिकृत नोंद अथवा पडताळणी न करता भाड्याने घरे दिली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दींमध्ये विशेष “भाडेकरू नोंदणी व पडताळणी अभियान” राबविण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख स्वप्नील घरत यांनी केली आहे.यासंदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत भाडेकरूंची अधिकृत माहिती संकलित करून नोंद ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक घरमालकाने भाडेकरूचे पूर्ण नाव, कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड अथवा ओळखपत्र तपशील, कुटुंबातील सदस्यांची माहिती, व्यवसाय, घरमालकाचा संपर्क क्रमांक तसेच भाडेकराराची माहिती ग्रामपंचायतीकडे सादर करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या विशेष पडताळणी अभियानामुळे परिसरात वास्तव्यास असलेल्या संशयित व्यक्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, बेकायदेशीररीत्या राहणारे परप्रांतीय तसेच रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर यांची माहिती प्रशासनाला मिळण्यास मदत होईल. अनेक वेळा योग्य नोंद नसल्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासन आणि घरमालक यांच्या समन्वयातून पडताळणी प्रक्रिया राबविल्यास कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित व्यक्तींची माहिती तत्काळ उपलब्ध होऊन प्रशासनाला जलद कारवाई करणे सुलभ होईल. जनहित व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विशेष उपक्रम तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी स्वप्नील घरत यांनी केली आहे
