
52 कोटीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, व सही करणाऱ्या नगरसेवकांना पालिकेत येण्यास बंदी घालावी – युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविराज काळे
रविराज बबन काळे
प्रदेशाध्यक्ष – आप युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य.
9673268485
पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या तिजोरीवर चक्क लेखा विभाग,काही अधिकारी , ठेकेदार व काही नगरसेवक यांनी संगनमताने दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रक्कमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. या गंभीर भ्रष्टाचाराप्रकरणी प्रवीण जैन यांना तातडीने निलंबित करावे यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा.
या प्रकरणाची भीषणता इतकी मोठी आहे की, सन २०२६-२७ चे अधिकृत बजेट मंजूर असताना आणि त्यामध्ये संबंधित कामांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसतानाही २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या अखेरच्या कालखंडात सुमारे ७० हून अधिक विविध विभागांचे कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या पाणी पुरवठा, स्थापत्य, बीआरटी, नाशिक फाटा, मोशी रस्ते, तळवडे आणि भोसरी यांसारख्या विभागांची ही कामे होती, त्या विभाग प्रमुखांना (HOD) ला या व्यवहाराची साधी पुसटशी कल्पनाही देण्यात आली नाही. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांच्या सह्या आणल्या तरच बिल मिळेल” अशी अट घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास २० नगरसेवकांच्या सह्या घेऊन हा बनाव रचला गेला, ज्या जनरल बॉडीच्या बोगस उपसूचनांचा आधार घेऊन ही कोट्यवधींची खैरात करण्यात आली, त्या उपसूचनांवर साधी तारीखही नाही. महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असल्याचे भासवणाऱ्या प्रवीण जैन यांनी चक्क ‘बँक ऑफ बडोदा’ मधील मुदत ठेवी (FD) कोणतीही अधिकृत बिडिंग प्रक्रिया न राबवता परस्पर मोडून ठेकेदारांचे खिसे भरले आहेत.
या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन हेच आहेत.
आमची मागणी:-
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या ६० ते ७० कामे नक्की झाले किंवा कसे?
२)लेखापाल यांनी परस्पर आर्थिक वर्गीकरणाचा निर्णय घेणे,बजेट तरतूद नसताना सुमारे ५२कोटी पेक्षा अधिक रक्कम संबंधित ठेकेदारांना अदा केले किंवा कसे?
३) बँक ऑफ बडोदा मधील मुदत ठेवी(एफ.डी.) कोणतीही अधिकृत बिडिंग प्रक्रिया न राबवता परस्पर त्यातून ठेकेदारांची बिले अदा केले किंवा कसे?
४) नगरसेवकांच्या सहया खऱ्या कि बनावट? खऱ्या असतील तर गुन्हा दाखल करण्यात यावा.चौकशी होईल नगरसेवकांना पालिकेत येण्यास बंदी घालावी.
५) महापालिकेचे मुख्य लेखापाल प्रवीण जैन, ६० ते ७० कामासंबंधीत अधिकारी, ठेकेदार,सल्लागार, पदाधिकारी नगरसेवक यांचे याप्रकरणी संगणमत होते किंवा कसे याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी.
हा केवळ तांत्रिक घोळ नसून महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी,नगरसेवक ,ठेकेदारानी संगनमताने टाकलेला थेट दरोडाच म्हणावा लागेल. नवीन वर्षाचे बजेट मंजूर असताना, त्यात कोणतीही तरतूद नसताना मा. स्थायी समिती, मा. महापालिका सभेला फाट्यावर मारून सुमारे ५२ कोटी रुपये परस्पर वाटलेच कसे जातात? प्रवीण जैन यांनी प्रशासकीय शिस्तीचा भंग केला, तसेच मा. स्थायी समिती व मा. महापालिका सभा यांना फाट्यावर मारून ते कालच्या झालेल्या मा. स्थायी समितीच्या बैठकीलाही जाणूनबुजून गैरहजर राहिले. हा गंभीर गुन्हा आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.
