
रोहा तालुक्यात कृषी प्रक्रिया दार व ग्राहक संमेलन उत्साहात संपन्न
महेश मोहिते.रोहा
,, रायगड जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया दार व ग्राहक संमेलन मंगळवार दि. १८ मार्च २०२६ रोजी वरसे येथील ग्रामपंचायत सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर शेठ पाटील यांच्यासह विनोद पाशिलकर, रामा म्हात्रे, अमित मोहिते, संतोष भोईर, श्रीमंत ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांच्या प्रस्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यामागील उद्दिष्ट मांडले. शेतकऱ्यांनी केलेला संघर्ष, त्यांची यशोगाथा आणि उद्योजकतेकडे वाटचाल याची माहिती इतरांना मिळावी, तसेच रोहा तालुक्यात अधिकाधिक कृषी उद्योजक घडावेत, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद केले. तसेच ‘बीजामृत शेतकरी उत्पादक कंपनी’ व ‘ग्रोवेल शेतकरी उत्पादक कंपनी’ यांच्या उत्पादनांच्या आकर्षक पॅकेजिंगचे विशेष कौतुक केले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर मान्यवरांनी रोहा तालुक्यातील कृषी प्रक्रिया दारांनी उभारलेल्या विविध स्टॉलना भेट देऊन उत्पादने पाहिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी धनंजय जोशी यांनी ‘ग्रोवेल फार्मर प्रोड्युसर कंपनी’तर्फे उत्पादित मालाची माहिती देत उत्पादन प्रक्रियेतील अडचणी व बाजारपेठेत विक्रीचे अनुभव मांडले. तसेच सुरेश जैन, गणेश भगत, संतोष दिवकर, राजेंद्र जाधव आदी शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून अनुभव कथन करत इतरांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
