

उनाड गुरांबाबत देवकान्हे विभागीय शेतकऱ्यांचे तहसीलदार, पंचायत समिती व पशु संवर्धन खात्याला निवेदन.
रोहा ..(महेश मोहिते )
रोहा तालुक्यातील देवकान्हे विभागीय शेतकरी आणि शेतकरी संघटना यांनी मोकाट गुरांच्या समस्येबाबत स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे. गेली अनेक दिवस या मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस येथील शेतकरी अक्षरशःपिकांच्या नुकसानी पासून मेटाकुटीला आला आहे तर शेतीतील पिकांची नुकसानी तर काही ठिकाणी लागवड केलेल्या भाजी पाल्याच्या नुकसानीस ही गुरे कारणीभूत ठरत असल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली आणि बाहे येथील शेतकरी ग्रामस्थ एकत्रित येऊन शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी सदरील खात्यांना निवेदन दिले.
रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांची समस्या जिथे मोकाट गुरांमुळे शेती, पिकांना आणि सार्वजनिक आरोग्यास त्रास होतो. तब्बल पन्नासहून अधिक ही मोकाट गुरांची टोळी रात्रंदिवस शेत जमीन साऱ्या खलाटीत हैदोस घालत फिरत कुणाची भात शेतीचे पिक तर कोणाचे भाजीपाला पीक तर काहींनी सामूहिक केलेल्या कलिंगड लागवडीस अथवा त्यांच्या व्यवसायाला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याने या निवेदनाचे मुख्य मुद्दे तहसीलदार, पंचायत समिती आणि पशुसंवर्धन खात्यांना मोकाट गुरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी तसेच त्यांचे मुख्य मालकांवर दंड आकारणे आणि जनावरे पकडून गोशाळेत ठेवण्याची आग्रही मागणी या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी प्रगतशील शेतकरी रामचंद्र बामणे, धनाजी लोखंडे,राम महाडिक, रघुनाथ कोस्तेकर, धोंडू कचरे, किशोर भोईर, पांडुरंग गोसावी, अरविंद भिलारे, महादेव कचरे, सखाराम कचरे, देवकान्हे पोलीस पाटील दयाराम भोईर, किशोर कान्हेकर, आदी विभागातील शेतकरी आणि शेतकरी संस्थेचे पदाधिकारी यांनी रोहा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रावसाहेब राजेश थोरे यांना निवेदन देण्यात आले तसेच पंचायत समिती रोहा गट विकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश वारगे सहाय्यक प्रशासक अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले तसेच डॉ.प्रमोद नाना गायकवाड,
सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी पंचायत समिती रोहा व डॉ. प्रवीण धुमाळ पशु विकास अधिकारी यांना उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीच्या पिकांच्या नुकसानीचा पाढा वाचत हे विनंती निवेदन देण्यात आले.
मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध पावले उचलली जातात का शेतकरी संघटनांच्या निवेदनां नंतर तहसीलदार, पंचायत समिती आणि पशुसंवर्धन विभागाकडून तात्काळ कोणती कारवाई सुरू केली जाईल का आधीच बळीराजा वर ही नाना प्रकारचे संकट आहेत गेली अनेक वर्ष येथील कालव्याला पाणी नसल्याने उन्हाळी पीक घेता येत न्हवते त्यामुळे कित्येक हेक्टर ओलिताखाली येणारी शेतजमीन नापीक होती मात्र येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यातून कालव्याला सोडण्यात आलेला पाणी त्यामुळे येथील शेतकरी तसेच युवा शेतकरी वर्ग हा पुन्हा जोमाने शेती व्यवसायाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत असतानाच पिक वाचविण्यासाठी मुख्य कारवाई मोकाट गुरांना पकडून गोशाळा किंवा कोंडवाड्यात हलवणेसाठी कितपत प्रशासनाला यश मिळेल हे पहावे लागणार आहे.
