

असा लोकनेता पुन्हा होणे नाही. शोकसभेला शेकडो चाहत्यांनी हजेरी
रोहा (महेश मोहिते)
तो थाट, तो रुबाब, तो दरारा, पुन्हा होणे नाही अशी थोरवी सांगत लोकनेते, बहुजन समाजाचे आधारवड स्व. भाईसाहेब पाशिलकर यांच्या अनेक दशकांतील राजकारण मुख्यतः राजकारणातील समाजकारणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
प्रखर इच्छाशक्ती, कडक शिरस्ता, स्वच्छतेचे अग्रगण्य असलेले लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे शनिवार १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले आणि अवघा रायगड मुख्यतः रोहेकर शोकाकुल झाला. शहर, ग्रामीणातील सुखदुःख प्रसंगी घराघरांत गेलेल्या कडक तेवढ्याच गोड स्वभावाचे लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या जाण्याने सामान्यजन अक्षरशः हेलावून गेला. त्या आपल्या लाडक्या लोकनेत्याला समस्त रोहेकरांनी शुक्रवारी आयोजित शोकसभेत श्रद्धांजली, आदरांजली वाहिली.
आठवणी सांगताना स्व भाईसाहेब पाशिलकर यांचे अनेक सहकारी, बुजुर्ग, तरुण सद्गगतीत झाले. किती आठवणी सांगव्यात, माणूसपणाची प्रचिती द्यावी असे प्रत्येकाला वाटून गेले. तत्कालीन यशवंत ग्रामपंचायतचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती ते जिल्हा परिषदेचे सभापती, उपाध्यक्ष कार्यकाळात भाईसाहेब पाशिलकर यांनी सामान्यजन, शेतकरी, ग्रामीण भागातील जनतेची सेवा केली. त्यामुळेच पाशिलकर यांचे स्थान हजारोंच्या हदयात घर करून राहिले. हेच भावनिक दृश्य पाशिलकर यांच्या अंत्ययात्रेला दिसून आले. दुसरीकडे शुक्रवारी आयोजित केलेल्या शोकसभेतील उपस्थिती ही भाईसाहेब पाशिलकर यांच्या कार्याची, कामाची प्रेमळ पोचपावती मिळाली. जणूकाही समग्र भाईसाहेब पाशिलकर असे म्हणत उपस्थितीनी भरभरून आठवणी सांगत कार्याला उजाळा दिला.
समस्त रोहेकर आयोजित जेष्ठ नागरिक सभागृहात शोकसभा घेण्यात आली. तो थाट, तो रुबाब, तो दरारा, पुन्हा होणे नाही हे बॅनरवरील घोषवाक्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. शोकसभेला माजी आ अनिकेत तटकरे, रोहा इंड असो.चे अध्यक्ष पी पी. बारदेशकर, ॲड. राजीव साबळे, विजयराव मोरे, सहकारी मारुती खरीवले, सुरेश मगर, आप्पा देशमुख, ॲड. मनोज शिंदे, उद्देश वाडकर, अशोक धोत्रे, नंदकुमार म्हात्रे, स्नेहा अंबरे, उस्मान रोहेकर, नारायण धनवी, सुरेश महाबळे, अमित उकडे, महेश ठाकूर, राजेंद्र जैन, लिलाधर मोरे, सचिन शेडगे, सूर्यकांत मोरे यांसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, शेकडो चाहते लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. आठवणींत ॲड. राजीव साहेब यांनी जिल्हा परिषद राजकारणातील खुमाखदार डावपेच आठवणी सांगितल्या. दरारा आणि मिश्किलता आम्ही अनुभवली आहे. पण घडामोडी घडून गेल्यावर कटुता न ठेवणारे भाईसाहेब पाशिलकर आम्ही पहिले, ते खरे लोकनेते होते. माझ्या राजकीय वाटचालीत भाईंचा सिंहाचा वाटा होता असे ॲड. साबळे यांनी सांगितले. रोहा इंड. असो.चे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनी धाटाव एमआयडीसीला नेते भाईसाहेब पाशीलकर यांचे कायम पाठबळ मिळाले. आंदोलन काळातही कंपन्या बंद राहता कामा नयेत, कंपन्या वाढल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, ही भूमिका भाईंची होती असे सांगत औद्योगिक विकासावर ठाम विश्वास असलेला, विकास आणि कामगार हक्क याचा समन्वय साधणारा नेता म्हणजेच भाईसाहेब पाटीलकर होते असे बारदेशकर यांनी सांगितले.
भाईसाहेब पाशिलकर गुरुतुल्य होते. विद्यार्थी दशेपासून राजकारण, समाजकारणात नेहमीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप होती. प्रत्येक वाढदिवसाला आवर्जून घरी येणारे भाईसाहेब पाशिलकर यांची नेहमीच उणीव राहिल, लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे कार्य, काम आठवणी रूपात राहण्यासाठी आपण सर्वांनी ठोस काही करू यात अशी भावना ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. बुजुर्ग मारुतीराव खरीवले यांनी कार्यकर्ता, ठेकेदार यांचा चेक घरी घेऊन येणारा नेता म्हणजेच भाईसाहेब पाशिलकर होते. ते बहुजनांचे देव होते असे सांगत खरिवले यांचे डोळे पाणावले. राजकारण, समाजकारणात प्रत्येकाला उभे करण्याचे काम लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांनी केले. माझ्याही राजकीय जडणघडणीत भाईंचा खूप अनमोल वाटा आहे असे सुरेश मगर म्हणाले. माजी आ अनिकेत तटकरे यांनी भाईसाहेब काशीकर यांच्या राजकीय मुख्यतः कौटुंबिक नात्यांची घडी अलगद उलघडली. आजोबा दत्ताजीराव तटकरे यांच्यानंतर भाईसाहेबांनीच आम्हा भावांना आजोबांची माया दिली. आमच्या कुटुंबाची, तटकरे साहेबांची काळजी घेणारे भाईसाहेब एकमेव होते. आमच्या यशाचा सर्वाधिक आनंद भाईंना होत असे. त्यांची राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जडणघडण, सामान्यांशी जुळलेली नाळ थक्क करणारी आहे. जणूकाही समग्र भाईसाहेब पाशिलकर असेच वर्णन सार्थ ठरेल. भाईसाहेब पाशिलकर यांच्या महत् कार्यातील आठवणींचा समग्र वाड:मय पुस्तकरूपात यावेत, आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, माझे सर्वोत्तपरी सहकार्य राहील अशी मनोमन भावना तटकरे यांनी व्यक्त केली.
उपस्थित अनेकांनी श्रद्धांजलीवर मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालक राजेंद्र जाधव यांनी केले. लोकनेत्याला आदरांजली शोकसभा यशस्वी करण्यासाठी अप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वकष चाहत्यांनी विशेष परिश्रम घेतले.
