

अॅट्रॉसिटीची तक्रार धूळ खात; २१ दिवसांनंतरही FIR नाही
उरण पोलिसांच्या उदासीनतेमुळे कातकरी तरुण वाऱ्यावर
पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि घर-जमिनीचा बळजबरीने ताबा, असे गंभीर आरोप असलेली एक अॅट्रॉसिटी तक्रार तीन आठवड्यांपासून उरण पोलीस ठाण्यात पडून आहे. अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. “पोलीसच तक्रार घेत नसतील, तर गरीब आदिवासीने न्याय कुठे मागायचा?” असा संतप्त सवाल कातकरी समाजातील किशोर अंकुश वाघमारे (२२) यांनी केला आहे.
बेलवाडी-कामथवाडी (कुंडेवहाळ) येथील वाघमारे यांनी २२ सप्टेंबरला आठ जणांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीत आणखी आरोप आहेत:
आदिवासी देवतांची विटंबना.
पुरावे नष्ट करणे.
कुटुंबाला बेघर करणे.
२४ सप्टेंबरला त्यांनी अंतिम सूचना पत्र दिले. २ ऑक्टोबरला थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. तरीही ना गुन्हा दाखल झाला, ना संरक्षण मिळाले.
दखलपात्र गुन्ह्यात FIR नोंदवणे पोलिसांवर बंधनकारक आहे, असे BNSS कलम १७३ आणि सर्वोच्च न्यायालयाचा ललिता कुमारी निकाल सांगतात. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यालाच शिक्षेची तरतूद आहे. तरीही ही दिरंगाई का, असा प्रश्न आदिवासी समाजातून विचारला जात आहे.
वाघमारे यांच्या मागण्या:
तात्काळ गुन्हा दाखल करावा.
वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत तपास करावा.
कुटुंबाला संरक्षण द्यावे.
दोषी पोलिसांची चौकशी करावी.
अन्यथा विशेष न्यायालय, अनुसूचित जमाती आयोग आणि मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उरण पोलिसांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
