


रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का! संतोषशेठ पोटफोडे-अमित उकडे यांचा शिवसेनेत प्रवेश; ‘त्या’ जुन्या विधानाची पुन्हा जोरदार चर्चा!
रोहा:समीर बामुगडे
रोहा : रोहा तालुक्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी नगराध्यक्ष संतोषशेठ पोटफोडे आणि रोहा शहराध्यक्ष अमितजी उकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री भारतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पक्षप्रवेशामुळे रोह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विशेष म्हणजे, संतोषशेठ पोटफोडे यांचे तटकरे कुटुंबाशी कौटुंबिक नातेही आहे. आमदार अनिकेत तटकरे यांचे ते सासरे आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे केवळ पक्षबदल म्हणून नव्हे, तर रोह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
संतोषशेठ पोटफोडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना केलेल्या एका जुन्या भाषणाची सध्या रोह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावेळी तटकरे साहेबांशी असलेल्या संबंधांबाबत बोलताना त्यांनी, “जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत माझं आणि तटकरे साहेबांचं नातं अतूट राहील…” असे ठामपणे म्हटले होते.
मात्र, राजकारणात समीकरणे कधी बदलतील सांगता येत नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत संतोषशेठ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने त्यांच्या जुन्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सामान्यतः निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराची लाट पाहायला मिळते. मात्र, कोणतीही निवडणूक नसताना रोह्यातील दोन महत्त्वाच्या राजकीय चेहऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या घडामोडीचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
संतोषशेठ पोटफोडे यांच्यासोबत अमितजी उकडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने रोहा शहरातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक राजकारणावर याचा काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कौटुंबिक सोयरिक एका बाजूला आणि राजकीय भूमिका दुसऱ्या बाजूला, अशा परिस्थितीत संतोषशेठ पोटफोडे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे रोह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. पालकमंत्री भारतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेनेने रोह्यात आपली राजकीय ताकद वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याची चर्चा आहे.
आता संतोषशेठ पोटफोडे आणि अमित उकडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर रोह्यातील राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात आणि आगामी काळात त्याचा तटकरे गटावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रोह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे; आता पुढचा राजकीय डाव कोणाचा, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे!
