
सर्वज्ञ कात फॅक्टरीतील संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारखाना मालकावर कठोर कारवाईची मागणी
प्रतिनिधी मंडणगड
मंडणगड तालुक्यातील सर्वज्ञ कात फॅक्टरीमध्ये काम करणारे सदु सखाराम मोकाशी (वय ४२) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून कारखाना व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात मृताच्या भावाने यशवंत सखाराम मोकाशी यांनी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य कारखाना निरीक्षकांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, ३० जून २०२६ रोजी फॅक्टरी परिसरात सदु मोकाशी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेबाबत मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५/२०२६ दाखल करण्यात आला असला, तरी तपासात अपेक्षित गती मिळालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जात कारखाना मालक विजय सिताराम काते आणि स्वाती विनोद वावडेकर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, वैद्यकीय कागदपत्रे, पोस्टमॉर्टेम अहवाल आणि इतर महत्त्वाचे पुरावे तातडीने जप्त करून त्यांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
याशिवाय कारखान्यात कामगार सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन झाले होते का, तसेच कारखाना कायदा आणि इतर कामगार कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास कारखाना व्यवस्थापनावर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करावी, असे अर्जात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मृत कामगाराच्या कुटुंबाला Employees’ Compensation Act, 1923 अंतर्गत योग्य मोबदला, पोलीस संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच स्थानिक पोलिसांवरील अविश्वास व्यक्त करत हा तपास सीआयडी किंवा विशेष तपास पथकाकडे सोपविण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी, कामगार विभाग आणि राज्य सरकारने निष्पक्ष तपास करावा, सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
