विश्वासाचा भक्कम पाया… रायगड जिल्हा बँकेची ८ हजार कोटींच्या व्यवसायापर्यंत विक्रमी भरारी!
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८,००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा गाठत सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या चार वर्षांत व्यवसायात दुपटीहून अधिक वाढ नोंदवत बँकेने ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.गेल्या ६५ वर्षांपासून शेतकरी, सभासद, महिला बचत गट, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणाऱ्या बँकेने डिजिटल बँकिंग, कोअर बँकिंग प्रणाली, रुपे केसीसी कार्ड आणि ग्राहकाभिमुख सेवांच्या माध्यमातून ग्रामीण भागातही आधुनिक बँकिंग सुविधा पोहोचवल्या आहेत.बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी या यशाचे श्रेय ग्राहक, सभासद आणि सहकारी संस्थांच्या विश्वासाला दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हा टप्पा गाठल्याचे सांगत मार्च २०२८ पर्यंत १० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे लक्ष्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.
