

शेतकरी जगला तर देश जगेल; तरुणांनी शेतीकडे वळणे काळाची गरज”रोहा पंचायत समितीत कृषी दिन उत्साहात; प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, सेंद्रिय व एकात्मिक शेतीवर भर
रोहा : महेश मोहिते.
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समिती येथे कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच आधुनिक, सेंद्रिय आणि एकात्मिक शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती विजया पाशीलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, गटनेते किसनराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य निधी जाधव, उर्वशी वाडकर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, जगन्नाथ धनवडे, समृद्धी कोळी, गटविकास अधिकारी अमृता उंडरे-पाटील, विस्तार अधिकारी दिलीप पाबरेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज लाटे, प्रथमेश डाके, दीपक फाउंडेशनचे दीपक ठोसर, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभापती विजया पाशीलकर यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. उपसभापती संजय मांडलूस्कर यांनी “शेतकरी जगला तर देश जगेल” असे प्रतिपादन करत तरुणांनी शेतीकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या योजनांची माहिती देण्याची आवश्यकता व्यक्त करत, अन्यथा योजना केवळ कागदावरच राहतील, अशी खंत व्यक्त केली. पारंपरिक सणांसाठी झाडे तोडली जात असल्यास त्याच प्रमाणात वृक्षलागवड करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी अधिकारी राखी उपनवर यांनी कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दिलेला दृष्टिकोन आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.कृषी तज्ज्ञ जीवन आरेकर यांनी आधुनिक व पारंपरिक शेतीचे महत्त्व, हवामान बदल व एल-निनोच्या परिणामांचा शेतीवर होणारा प्रभाव, एकात्मिक शेतीची आवश्यकता, तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यांसारख्या जोडधंद्यांचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पाणी व्यवस्थापन, मृदा परीक्षण आणि कृषी उत्पादनाच्या बाजारपेठ व्यवस्थापनाबाबतही शेतकऱ्यांना माहिती दिली.प्रदीक पावस्कर यांनी दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच राज्य व जिल्हास्तरीय योजनांची माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी ऋषिकेश कदम यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध कृषीपूरक योजनांबाबत मार्गदर्शन केले. नेहा पाटील यांनी उमेद बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती दिली.यावेळी महादेव सानप (गावठाण), सुदाम रटाटे (धाटाव), अनिल लहाने (पुई), भागोजी ढुंमने (करिवणे), श्रीकांत निवाते (तिसे), प्रदीप दामूगडे (भालगाव), अनंता पाशीलकर (शेणावई), होनाजी हंबीर (काळकाई), ज्ञानेश्वर शेळके (पळस), रुपेश साळवी (निवी), राजेश शिर्के (गोवे), एकनाथ वाडकर (कोकबन) आणि गजानन डाकी (शेतपळस) या प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.पंचायत समिती सदस्य सुरेश मगर यांनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद सदस्य निधी जाधव यांनी कोरोना काळात संपूर्ण जग थांबले असताना शेतकरी मात्र अविरतपणे कार्यरत होता, याची आठवण करून देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.गटविकास अधिकारी अमृता उंडरे-पाटील यांनी पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे यांनी केले.
