
रासायनिक व विनाशकारी प्रकल्प कोकणात नको; संजय कोकरे यांची ठाम भूमिकापर्यावरण, स्थानिकांचे हित आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची मागणी
कर्जत: जयेश जाधव
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी कोकण परिसरात रासायनिक तसेच पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या विनाशकारी औद्योगिक प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला आहे. कोकणाचा नैसर्गिक वारसा, जैवविविधता, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य यांचे संरक्षण हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.कोकरे यांनी सांगितले की, कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प राबविण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग, जनमताचा आदर आणि सर्व कायदेशीर व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होणार नाही, याची शासनाने खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली. विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणारे धोरण स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.स्वतंत्र कोकण राज्य अभियानाने कोकणातील नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणारे धोरण राबविण्याचे आवाहन केले आहे.यावेळी बोलताना संजय कोकरे म्हणाले, “कोकणाचा विकास हा पर्यावरण, स्थानिकांचे हित आणि शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवूनच व्हावा. रासायनिक व विनाशकारी प्रकल्पांना कोकणात स्थान नसावे.”
