

रोहेकरांची पाणीपट्टी कमी करण्यासाठी प्रशासन हलू लागले.शिवसेनेच्या आंदोलनाचा दणका .
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
शिवसेनेने बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर रोहेकरांची पाणीपट्टी कमी करण्यासाठी आता प्रशासन हलू लागले आहे. नगरपरिषदेने तब्बल ५५ टक्के एवढी पाणीपट्टी वाढवली होती. पण त्याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन उभारले असून त्याच्या दणक्याने प्रशासनाला अखेर नरमाईची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे वाढीव पाणीपट्टीबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.मार्च महिन्यातच वाढीव पाणीपट्टी मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेला दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न करता वाढीव दराने वसुली सुरू केली.याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक २२ जूनपासून बेमुदत उपोषणाला बसले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी आजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे सविस्तर चर्चा केली. यावेळी वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चादेखील झाली असल्याचे काफरे यांनी सांगितले. दरम्यान नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान वाढीव पाणीपट्टीच्या प्रश्नावर शनिवारी तोडगा काढण्यात येणार असल्याने प्रशासनाच्या या निर्णयाकडे रोहेकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
