अंगणवाडी योजनांवर गैरव्यवहाराचे आरोप; साहित्य २५ टक्के, निधी १०० टक्के? आरोपांबाबत माहिती नसल्याचे निर्मला कुचिक यांचे स्पष्टीकरण
रायगड – अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजनांमध्ये अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप महिला व बाल कल्याण सभापती रसिका केणी यांनी पत्रकार परिषदेत केला. अंगणवाड्यांना विद्युत जोडणी देण्यासाठी काढलेल्या निविदांना आठ महिने उलटूनही अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ई-टेंडर प्रक्रियेत केवळ तीनच निविदा प्राप्त झाल्याने निविदा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.अंगणवाड्यांमध्ये वितरित होणारे साहित्य आणि पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करताना केणी यांनी प्रत्यक्षात २५ टक्के साहित्य वितरण करून १०० टक्के निधी खर्च झाल्याचे दाखविले जात असल्याचा दावा केला. तसेच अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले सोलर पॅनल बसविण्यात न आल्याने ते पडून राहिल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.दरम्यान, या आरोपांबाबत महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी प्रतिक्रिया देताना, “सभापती रसिका केणी यांनी केलेल्या आरोपांबाबत मला काही माहिती नाही. माझ्या कार्यालयातील कामकाज नियमितपणे सुरू असून सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविल्या जात आहेत,” असे सांगितले.यामुळे महिला व बाल कल्याण विभागातील कामकाजाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून या प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
