
सेन्स्क्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनमानी, मर्जीतल्या लोकांना ठेका, नोकऱ्या, सबकुछ मलईदार सामाजिक क्षेत्रात दायित्व शून्य, फक्त बोलबच्चन
(महेश मोहिते.रोहा प्रतिनिधी)
वायू प्रदूषणाची धुपारत सहन करणाऱ्या तळाघर, निवी हद्दीतील गावांसाठी कधीच उपयोगी न पडणाऱ्या, कडधान्य, भात व पर्यावरणाच्या नुकसानीत अग्रेसर असलेल्या किंबहुना सामाजिक क्षेत्रात दायित्व शून्य लौकिकतेच्या पूर्वीच्या सॉल्वे आताच्या सेन्स्क्यू स्पेशालिटीज कंपनीचे युनिट हेड अधिकाऱ्यांची मनमानी पुन्हा चर्चेत आली. मर्जीतल्या लोकांनाच विविध ठेका, वैयक्तिक कामांत पसंती, ठेकेदारांचे नातलग, ओळखधाऱ्यांना नोकऱ्या त्यातून सबकुछ मलईदार पर्व अविरत चालू असण्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. सामाजिक कार्यकर्त्यांना आश्वासीत करायचे, शेती पर्यावरणाची किती माहिती, स्वतःला गोडी आहे हे दाखवून खिलवून ठेवणारे युनिट हेड विजयकुमार चौगुले हे निव्वळ बोलबच्चन असल्याचे अधोरेखीत झाले. दरम्यान, नोकरीत वशिलाबाजीला प्राधान्य देण्यात धन्यता मानणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांच्या वर्तनाने सामान्य कुटुंबातील तरुणांवर किती अन्याय केला जातो याचे भान नसण्याच्या अधिकाऱ्यांविरोधात अक्षरशः असंतोष वाढत आहे तर वायू प्रदूषणाची कायम मात्रा वाढवत तळाघर, लांढर, निवी हद्दीतील विविध शेत पिकांची नासाडी करणाऱ्या सेन्स्क्यू कंपनी विरोधात बळीराजा फाऊंडेशन लवकरच ॲक्शन मोडवर येणार असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली. यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी काय स्पष्टीकरण देतात ? हे पाहावे लागणार आहे. पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात एमआयडीसीतील अनेक कंपन्या कायम दायित्व देतात. मुळात तळाघर, निवी परिसरात विषारी वायूची धुपारत करत शेती पिके, वातावरण धोक्यात आणणाऱ्या सेन्स्क्यू डीएमसी, युनिकेम, अंशूल कंपनी विरोधात नागरिकांत आधीच संताप आहे. सेन्स्क्यू, डीएमसी कंपनी व्यवस्थापक भागातील विधायक कार्यात सहभाग घेत नाहीत. दुसरीकडे भागातील तरुणांना नोकऱ्या देण्यात सेन्स्क्यू कंपनीचे अधिकारी आखडता हात घेतात, मोजक्या ठेकेदारांना ठेक्याची रसद पुरवतात, मर्जीतल्या लोकांना नोकऱ्या देतात हे सर्वश्रुत आहे. युनिट हेड विजयकुमार चौगुले यांची बोलबच्चनगिरी मास्टरकी आहे. सामाजिक दायित्वाचे कोणतेच आश्वासन पूर्ण करत नाहीत. याउलट आपण शेती, पर्यावरण प्रेमी आहोत अशी तासनतास बतावणी करतात. पण त्यांची कृती पूर्णतः शून्य आहे हे वारंवार समोर आले. कंपनी मागील गावांना वायू प्रदूषणात गुदमरायला लावणाऱ्या आताच्या सेन्स्क्यू कंपनी विरोधात आपण आक्रमक भूमिका घेण्यावर ठाम आहोत. नोकर भरतीतही भेदभाव केला जातो, हेही संतापजनक आहे. त्यामुळे सेन्स्क्यू, डीएमसी कंपनी विरोधात संबंधीत विभागात तक्रार प्रसंगी आक्रमक पवित्रा घेवू असा ईशारा सचिव ॲड दीपक भगत यांनी दिल्याने काय होणार, हे समोर येणार आहे. दरम्यान, संबंधीत स्थानिक अधिकारी वरिष्ठ व्यवस्थापनाची दिशाभूल करत आहेत, याची चिरफाड करत वरिष्ठ व्यवस्थापनाकडेही तक्रार होणार असल्याने प्रकरण कुठवर जाते ? हे पाहणे आता मजेशीर ठरणार आहे.
