
*पनवेल महानगरपालिकेला हिंदुस्थानातील क्रांतिवीरांचा विसर*
खारपाडा : सुरेश तांडेल ( ता .पनवेल )
नवीन पनवेल येथील अदई सर्कलला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून क्रिकेट थीम उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिक व क्रांतिवीरप्रेमीत नाराजी व्यक्त होत आहे. सदर क्रिकेट थीम हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी १९/०५/२०२६ रोजी छावा क्रांतिवीर सेनेने पनवेल महानगरपालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले मोठे क्रांतिकारक होते. रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात त्यांचा जन्म झाला होता. इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी सामान्य जनता, रामोशी, कोळी, धनगर आणि इतर समाजघटकांना एकत्र करून स्वराज्यासाठी संघर्ष उभारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. इंग्रज सरकारने त्यांना अटक करून एडन येथील तुरुंगात ठेवले, जिथे 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या बलिदानामुळे पुढील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा प्रमुख रोशन महादेव पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पनवेल महानगरपालिका हिंदुस्थानातील क्रांतिवीरांचे नाव आणि इतिहास संपवण्याचे काम करत आहे. ज्या चौकाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आले आहे, त्या ठिकाणी त्यांच्या इतिहासाशी कोणताही संबंध नसलेली क्रिकेट थीम उभारणे हे दुर्दैवी आहे. महानगरपालिकेने क्रांतिवीरांच्या स्मृती जपण्याऐवजी त्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करू नये. नवीन पिढीसमोर देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा इतिहास उभा राहणे गरजेचे आहे.”अशा महान क्रांतिकारकाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकात क्रिकेट थीमऐवजी त्यांच्या इतिहासाची आठवण करून देणारे प्रेरणादायी स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.ही मागणी छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन पवार, सचिव श्रेयश ठोकळ, संपर्क प्रमुख स्वप्नील घरत, कार्याध्यक्ष विशाल देशमुख, संघटक राजेश रसाळ, सदस्य संग्राम भोपी, दैनिक सामना उपसंपादक योगेश मुकादम, पनवेल तालुका अध्यक्ष सुमित जले तसेच सुश्रुत भोईर यांनी केली आहे.
