
एक्सल स्टॉप वर जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी जातोय वाया,अपघाताची शक्यता.
रोहा (महेश मोहिते )
रोहा कोलाड मार्गावरील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील एक्सल स्टॉप वर पाण्याची लाईन लिकेज असल्याने नागरिकांसह प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज अपघात होत आहेत. गेले अनेक दिवस येथे पाणी साचत असल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे. ह्या महत्वाच्या रस्त्याला आता खड्डा पडून रस्ताच खराब झाला आहे. कोणताही चालक पाण्यातून गाडी टाकायला मागत नसल्याने चुकीच्या बाजूने जात असल्याने अपघात होत आहेत. मोठा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. रोज लाखो करोडो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाला भर उन्हाळ्यात पाण्याचे महत्व समजत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.पाणी हे जीवन आहे, पाणी जपून वापरा पाण्याचा दुरुपयोग टाळा असा सल्ला देणारे प्रशासनातील अधिकारी आता कुठे आहेत? त्यांना हे दिसत नाही की त्यांनी आता डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.रहदारीच्या ठिकाणी भर रस्त्यात गेले काही दिवस ही समस्या निर्माण झाली असून कोणताच अधिकारी येऊन पाहणी करत नाही, समस्या सोडवत नाही त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.या मार्गातून एमआयडीसी, जे एस डब्ल्यू साळाव,वरसे ग्रामपंचायत, रोहा नगर परिषद यांच्या पाण्याच्या पाईप लाइन गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण हात वर करत आहे. आपली जबदारी झटकत आहेत. नक्की कोणाची पाईप लाइन लिकेज आहे याबाबत सविस्तर माहिती नसली तरी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करून समस्य दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.नागरिकांसह प्रवासी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेऊन येथील रहिवाशी शिवसेना विभाग प्रमुख निलेशशेठ वारंगे यांनी याबाबत जोरदार आवाज उठवला असून एम आय डी सी, तहसील कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे .असून लवकरात लवकर समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे.
