

अजितदादांप्रमाणेच कोकणाच्या विकासासाठी कायम सोबत राहीन” – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
रोह्यात साडेबारा कोटी रुपये विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
महेश मोहिते : प्रतिनिधी
रोह्यात कुंडलिका नदी किनाऱ्यावरील विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधकाम व नदी संवर्धनाची विविध कामे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे “खाऊ गल्ली” विकसित करणे, रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील आरक्षण क्र. ०७ येथे स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक (रक्तपेढी) अद्यावत करणे, तसेच कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेल्या “शिवसृष्टी” शिल्प उभारणीचे काम आणि श्री धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नूतनीकरणासह विविध विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक ११ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
तर त्या डॉ. चिंतामण देशमुख नाट्यगृह सभागृहात बोलताना सांगितले की, कोकण आणि रायगडबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना भावनिक उजाळा दिला. “अजितदादांचे कोकणावर विशेष प्रेम होते. कोकणातील साधी, प्रामाणिक आणि मेहनती माणसं त्यांच्या मनाच्या खूप जवळ होती. कोकणच्या विकासासाठी ते नेहमीच झुकतं माप द्यायचे. रायगडसह रोहा शहरातील अनेक विकासकामांमध्ये त्यांचे विशेष लक्ष आणि योगदान होते. त्यामुळे आज रोहा आणि संपूर्ण कोकणात दिसणाऱ्या विकासामागे दादांचा मोठा वाटा आहे, असे त्या म्हणाल्या.
तटकरे कुटुंबीयांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. “तटकरे साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावताना सांगितले की, अजितदादांशिवाय आम्ही एकही कार्यक्रम केला नाही. त्यामुळे हा जिव्हाळा, ही परंपरा आणि हे नातं कायम राहील,” असे सांगत त्यांनी रायगड आणि रोह्याशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले.
यावेळी त्यांनी श्री धावीर महाराज मंदिर परिसर विकास, कुंडलिका नदी संवर्धन, संरक्षण भिंत, खाऊ गल्ली आणि ब्लड बँक आधुनिकीकरण यांसारख्या विविध विकासकामांची माहिती दिली. ही केवळ विकासकामे नसून श्रद्धा, संस्कृती, पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार यांचा समतोल साधणारी लोकाभिमुख कामे आहेत, असे त्यांनी नमूद केले. कुंडलिका नदीकाठ संरक्षण भिंतीमुळे पूरस्थितीत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून खाऊ गल्ली प्रकल्पातून महिला बचत गट आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . विकास म्हणजे फक्त इमारती उभारणे नव्हे, तर सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, असे सांगत त्यांनी रोहा शहराच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. “अजितदादांप्रमाणेच मी देखील कोकण आणि रायगडच्या विकासासाठी कायम आपल्या सोबत उभी राहीन,” असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वागत करताना भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त केले. “अजितदादांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला दिलेली सेवा, विकासाची दूरदृष्टी आणि कोकणावरील प्रेम हे सर्वांनी अनुभवले आहे. कठीण प्रसंगातही संयमाने उभे राहून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करण्याची परंपरा पवार कुटुंबाने जपली आहे,” असे ते म्हणाले . कोकणाच्या विकासासाठी अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगत कोरोनाच्या कठीण काळात कोकणात प्रत्यक्ष येणारे ते एकमेव मोठे नेते होते, असे तटकरे यांनी नमूद केले. सागरी महामार्ग, पायाभूत सुविधा आणि विकासकामांबाबत अजितदादांनी नेहमीच विशेष लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले.
रोह्यातील नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचाही त्यांनी उल्लेख केला. “दशावतार आणि नाट्यचळवळीची परंपरा रोह्याला लाभली असून या भूमीने अनेक कलावंत घडवले,” असे सांगताना त्यांनी अजित पवार यांच्या रोह्यातील एका कार्यक्रमातील भाषणाची आठवण सांगितली. “सभागृहात हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू असताना त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू आम्ही पाहिले होते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
बारामतीच्या विकास मॉडेलचाही त्यांनी उल्लेख केला. “दुष्काळी भाग असलेल्या बारामतीला शरद पवार साहेब आणि अजितदादांनी विकासाच्या शिखरावर नेले. देशातील अनेक नेत्यांनी बारामती मॉडेलचा आदर्श म्हणून उल्लेख केला आहे. रात्री दोन वाजताही झाडांना पाणी दिले जात होते, त्यामागे ४० वर्षांची तपश्चर्या आहे,” असे सांगत त्यांनी विकासासाठी सातत्य आणि समर्पण आवश्यक असल्याचे नमूद केले.
कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांना बारामती येथील कामे पाहण्यासाठी पाठवले. “रायगड जिल्ह्याच्या भविष्यातील विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करणार आहोत. अजितदादांप्रमाणेच वहिनींचेही रायगडवर प्रेम आणि लक्ष कायम राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक सादर करताना मंत्री अदिती तटकरे आणायला की , रोहा शहरात होत असलेल्या विविध विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे रायगड जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले. “स्वर्गीय अजित पवार यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत होते. कोकणावर त्यांचे विशेष प्रेम होते. श्रीवर्धन मतदारसंघावर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे आणि त्यामुळेच आज या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे उभी राहिलेली दिसत आहेत. एखाद्या कामामध्ये उभे राहिले की दादा जागच्या जागी चुका दाखवून द्यायचे आणि काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे होईल याबाबत मार्गदर्शन करायचे. असा नेता पुन्हा होणे नाही,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी त्यांनी कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प, ब्लड बँक आधुनिकीकरण, भक्त निवास तसेच महिला बचत गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या खाऊ गल्लीसारख्या प्रकल्पांची माहिती दिली. “दादांना अभिप्रेत असलेला विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगत कार्यकर्त्यांना अजितदादांनी कुटुंबाप्रमाणे जपल्याची भावनिक आठवण त्यांनी यावेळी सांगितली. तसेच “काकींचा आशीर्वाद कोकण आणि रायगड जिल्ह्यावर कायम राहो,” अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली. तर आभार प्रदर्शन रोहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी केले .
या वेळी जिल्हाधिकारी किसन जावळे , रायगडा अधीक्षक अचल दलाल , माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी सुधाकर घारे , मोलाना अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुश्ताक अंतुले , रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, रोहा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर , महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे , एड प्रविण ठाकुर , रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग, रोहा नगर परिषद नगराध्यक्षा वनश्री शेंडगे , पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर महाड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, विजयराव मोरे , मुरुडच्या नगराध्यक्ष दांडेकर यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
