
📰 वित्तीय साक्षरतेत उल्लेखनीय कार्य; सुप्रिया पाशिलकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बँक ऑफ इंडिया रायगड आणि क्रिसील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या वित्तीय साक्षरता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सौ. सुप्रिया संजय पाशिलकर यांना सन्मानित करण्यात आले.
१७ मार्च रोजी अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विशाल गोंडके (LDO, RBI मुंबई), सौ. दीपन्विता साहनी (विभाग प्रमुख, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग), विजयकुमार कुलकर्णी तसेच प्रदीप आपसुंडे (नाबार्ड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
रायगड जिल्ह्यातील रोहा, सुधागड आणि महाड या तालुक्यांमध्ये वित्तीय साक्षरता अभियान प्रभावीपणे राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सौ. सुप्रिया पाशिलकर (AAM, कोकण विभाग) यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हे अभियान पोहोचवून आर्थिक साक्षरतेचा प्रसार केला आहे.
तसेच तालुकानिहाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. रोहा तालुक्यातील सौ. संजीवनी जयेश माने (CM रोहा), महाड तालुक्यातील सौ. हेमलता समीर धुमाळ (CM महाड) आणि सुधागड तालुक्यातील कु. सोनाली निलेश पाटील (CM सुधागड) यांना गौरविण्यात आले.
याशिवाय, रोहा तालुक्यातील खांबरे, पेण तालुक्यातील वाशी आणि महाड तालुक्यातील मोहोत या ग्रामपंचायतींनी गावातील १०० टक्के नागरिकांना अपघाती विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनांच्या माध्यमातून संरक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा बळकट करण्यासाठी केलेल्या या कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता वाढून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
