

रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया पाशिलकर, उपसभापती तरुण चेहरा संजय मांडलुस्कर
कोलाड विभागाला प्राधान्य, राकेश शिंदेंच्या नेतृत्वाचा वरचष्मा
रोहा (महेश मोहिते )
खा सुनिल तटकरे यांसह सर्वकश तटकरेंचा होमग्रांऊड असलेल्या महत्त्वाच्या रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी दिवंगत लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या स्नुषा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्या पत्नी विजया पाशिलकर यांची पक्षश्रेष्ठी आदेशान्वये एकमताने निवड झाली तर उपसभापतीपदी तरुण चेहरा संजय मांडलुस्कर यांची निवड करत कोलाड विभागाला न्याय्य प्राधान्य दिल्याचे अधोरेखीत झाले. कोलाड विभागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी तटकरेंचे विश्वासू तरुण नेतृत्व राकेश शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती एकूण ३ ही जागा निवडून आणून शिंदे यांनी मोहीम फत्ते केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उपसभापती संजय मांडलुस्कर यांची निवड केल्याने निवडीत राकेश शिंदेंच्या नेतृत्वाचा वरचष्मा ठळकपणे नोंद झाल्याचे बोलले जात आहे. सभापतीपदी विजया पाशिलकर यांची वर्णी लागेल हे स्पष्ट होते. पाशिलकर यांची सभापतीपदी निवड करत पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द, जनमाणसात झालेली चर्चा पूर्ण झाल्याचे बुधवारी समोर आले. लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सुनबाई विजया पाशिलकर यांची सभापती निवड सासरे लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांना समर्पित ठरल्याची भावना व्यक्त झाली. दरम्यान, ना अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघ असलेल्या हक्काच्या धाटाव गणातील विजया पाशिलकर यांना पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान केल्याने मतदारसंघाला विकासकामांतून अधिक झुकते माप मिळेल अशी अपेक्षा व्यक्त झाली तर सामाजिक कार्यातील तरुण चेहरा संजय मांडलुस्कर यांच्या उपसभापती निवडीने कोलाड विभागाला प्राधान्य मिळाले अशी भावना कोलाडवासियांनी व्यक्त केली आहे.
रोहा पंचायत समितीची सभापती, उपसभापती निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापती, उपसभापतीसाठी क्रमशः नामनिर्देशन एकच दाखल झाल्याने सभापतीपदी विजया पाशिलकर, उपसभापतीपदी संजय मंडलुस्कर यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीतून स्थानिक सत्ताधारी राष्ट्रवादीने पंचायत समितीवर पुन्हा एकदा निर्वीवाद सत्ता मिळवली. उपसभापती स्पर्धेत भुवनेश्वर गणाचे सुरेश मगर असल्याची तुफान चर्चा सुरू होती. तरीही मगर उपसभापतीसाठी इच्छुक होते का ? हे अधिकृतपणे समोर आले नाही. संजय मांडलुस्कर यांच्या उपसभापती निवडीनंतर मात्र अडीच वर्षानंतर आरक्षीत सभापतीची संधी सुरेश मगर यांना मिळेल ? अशी बोलकी प्रतिक्रिया धाटाव गणातील एका तरुण नेतृत्वाने व्यक्त केली. सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर यांच्या निवडीनंतर राज्यारोहण अभिनंदन कार्यक्रम कै द ग तटकरे सभागृहात पार पडला. यावेळी माजी आ अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, नंदकुमार म्हात्रे, मनिषा पाटील, युवा नेतृत्व राकेश शिंदे, महिला अध्यक्ष प्रीतम पाटील, नगरपरिषद सभापती नीता हजारे, राजेंद्र जैन, राजेंद्र पोकळे, पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचीत सदस्य, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर यांच्या निवडीचे खा सुनिल तटकरे, ना आदिती तटकरे, माजी अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर पाटील व नेतेगणांनी अभिनंदन केले. निवडीनंतर सभापती विजया पाशीलकर यांनी हा सन्मान स्व लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांना समर्पित करते, खा सुनिल तटकरे, ना अदिती तटकरे, माजी आ अनिकेत तटकरे यांनी सभापतीपदी काम करण्याची मोठी संधी दिली. संधीचे सोने करत विश्वास सार्थ करेन अशी प्रतिक्रिया पाशिलकर यांनी दिली तर उपसभापती निवड ही पक्षश्रेष्ठींनी तरुण संघटनेला दिलेली संधी आहे. आपण तरुण संघटनेला अधिक बळ देऊ, खा सुनिल तटकरे, ना आदिती तटकरे, माजी आ अनिकेत तटकरे, युवा नेतृत्व राकेश शिंदे यांनी दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडू अशी भावना संजय मांडलुस्कर यांनी व्यक्त केली. दरम्यान, सभापती, उपसभापती निवडीने राष्ट्रवादीने पंचायत राजवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापीत केले. परंपरा कायम ठेवली हेच अधोरेखीत झाले आहे.
