

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त रोहा शहरात भव्य स्वच्छता अभियान , ३५ टन कचऱ्याचे संकलन
महेश मोहिते रोहा :
प्रतिनिधीमहाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने तसेच विविध पक्षांच्या सहकार्याने रविवारी (दि. १ मार्च २०२५) रोहा शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला नागरिक व श्रीसदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील सरकारी कार्यालय परिसर, शहरातील प्रमुख रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. शहरातील एकूण १२ प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून प्रमुख रस्ते, बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला.स्वच्छता मोहिमेत एकूण १११८ श्रीसदस्य व स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच रोहा नगरपरिषदेमधील नगराध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती लाभली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे अभियान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या स्वच्छता अभियानादरम्यान सुमारे ३५ टन कचरा संकलित करून डंपिंग ग्राउंड येथे पाठविण्यात आला. सकाळी ६ ते ११ या वेळेत श्रीसदस्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन संपूर्ण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले आहे.
