
क्रिकेटच्या अतिवेडाचा करिअरवर घाला ? तरुण चक्रव्युहात, ऐकतोय कोण ?बड्या उद्योजकांचीही स्पॉन्सर्स खैरात, आश्चर्यम्
रोहा (महेश मोहिते )
मानवी जीवनात सर्वच खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ खेळत खेळीयाड वृत्ती जपली पाहिजे. विविध खेळांतून तरुण राज्य, देश, विदेश खेळीयाड दुनियेत प्रतिष्ठा, पैसा कमावतात हे अभिमानास्पद आहे. याच खेळ प्रकारांतील क्रिकेटने आता मैदानांसोबत शेत, माळरान, गल्लीबोळाची जागा घेतली आणि अगदी लहानग्यांपासून वयस्कर लोकही क्रिकेट खेळत गुंतून गेलेत हे आनंदाचे आहे. दुसरीकडे गाव, वाडीपाड्यांतील अनेक तरुणांवर क्रिकेटच्या अतिवेडाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वत्र क्रिकेटच्या जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्या. पूर्वी सुट्टीच्या शनिवारी, रविवारी होणारा क्रिकेट सामना आता आठवड्यातील एकही वार सोडत नाही. त्यातून क्रिकेटच्या मायाजाळात तरुण कधी गुरफटला गेला कळलेच नाही हेच वास्तव जिल्हा, सर्व तालुक्यातून दिसून येत आहे. शहर, ग्रामीणातील तरुणाईला क्रिकेटने अक्षरशः विळखा घातला. अतिवेडाने अनेक तरुणाईतल्या प्रखर ईच्छाशक्ती, महत्त्वकांक्षेचा बळी घेतला, स्वप्नांवर मुरड आली. जणूकाही क्रिकेटचा अतिवेड तरुणांच्या करिअरवर घाला घाततो की काय ? असेच धाडसाने बोलावे लागेल. कंपन्यांत नोकरी, पगाराबाबत मर्यादीत महत्त्वकांक्षा, लहानशा कमाईवर समाधान मानणारा तरुण क्रिकेटच्या अतिवेडातून बाहेर येण्याचे नाव घेत नाही. बेभान झाला आहे. तरुणांसोबत शालेय विद्यार्थीही परिपाठ गिरवत आहेत. मग ऐकतोय कोण ? असेच अवघड जागी दुखणं झाले आहे. दरम्यान, आपापली कार्यकर्ता फॅक्टरी टिकवण्यासाठी क्रिकेट टीम, नविन फॅड आलेली लीग स्पर्धेला बक्षीस रूपातून खतपाणी घालण्याच्या पुढारी, नेत्यांच्या परंपरेत आता काही मराठी उद्योजकांनीही क्रिकेट लीगसाठी स्पॉन्सरची खैरात सुरू केल्याने तरुणांची करिअर की अधोगती असाच सवाल उपस्थित झाला आहे, तर नेते, पुढारी राजकारण, नको तो व्यवसाय उभारून मालामाल होता. उद्योजक शहरात उद्योग उभारून कुटुंबाचे राहणीमान उच्चप्रतीचे करतात, मग ग्रामीण तरुण क्रिकेटमध्ये कितपत गुंतून ठेवावीत ? याचा जरूर विचार करावा असेच अधोरेखित झाले आहे.कोकण मुख्यतः रायगडातील तरुण क्रिकेट खेळात अधिक गुंतल्याचे नवीन नाही. जणूकाही व्यसन लागले आहे. रत्नागिरी पट्टयातील तरुण शहरात वेठबिगर म्हणून वावरत आहे आणि रायगड जिल्हा, रोह्यासारख्या गाव वाडीपाड्यातील तरुण क्रिकेटच्या अधीन गेलाय हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मूळात आज स्थानिक तरुण प्रशासन सेवेत उच्च पदस्थ नोकरीत नाहीत. गटविकास, प्रांत, तहसील, पोलीस क्लास वन अधिकारी नाहीत हे सत्य आहे. तरुणांत मोठी स्वप्नच नाहीत. नोकर भरती, स्पर्धा परीक्षांत टक्का नाही. वनविभाग अन्य नोकर भरतीत रायगडातील एकही तरुण नव्हता, ही गंभीर बाब खुद्द खा सुनिल तटकरेंच्या निदर्शनास आणली होती. आता खुद्द रोह्यात सुरू होणाऱ्या स्पर्धा अकादमीत किती मुले सहभाग घेतात ? याच वास्तवात स्थानिक तरुण क्रिकेटच्या दुनियेत कमालीचा अडकून पडला आहे. नेते, पुढारी, काही उद्योजक अडकवून ठेवत असल्याचे दिसत आहे. क्रिकेटचा वेड आता आदिवासी, ठाकूर तरुणांनाही भुरळ घालत आहे. दुचाकीवर वेगवान तीनचार तरुण जाताना दिसतात, अपघातही होतात. तरुणांत व्यसनही वाढत असल्याचे लपून राहिले नाही. याच चर्चेत क्रिकेटचे अतिवेड आजच्या तरुणांच्या करिअरवर घाला घालत आहे. गाव वाडीपाड्यातील लीग स्पर्धेसाठी आता चक्क मराठी उद्योजकही उतरलेत, बक्षीसांची खैरात करत असल्याचे समोर आल्याने चाललेय काय ? स्वतः यशस्वी उद्योजक क्रिकेट तरुणांत नेमके काय पाहतात, भविष्य काय उज्ज्वल करू पाहतात ? हे अद्याप कळले नाही. तरीही जिल्हा, तालुक्यातील काही तरुणांना क्रिकेट अँकॅडमीत प्रवेश द्यावा, देश, राज्य क्रिकेट संघात जाण्यासाठी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त झाली. क्रिकेटच्या अतिवेडाने इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा गिळून टाकली, व्यसनाची मात्रा वाढली, आता क्रिकेट खेळातून उद्यातरी काय साध्य होते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नेते, पुढारी सारेजण शिक्षण, रोजगारावर बोलणार नाहीत. किमान यशस्वी उद्योजकाने जाणीवा ठेवून शिक्षण, रोजगार याचे जास्तीचे भान ठेवावे तर उद्योजक बाबुशेठ खानविलकर यांनी एका सोशल पोस्टद्वारे यापुढे क्रिकेट स्पर्धांना सहकार्य करता येणार नाही. केवळ शिक्षण, आरोग्य, रोजगार कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहील असे केलेले आवाहन क्रिकेटच्या अतिवेडावर कितपत मात्रा ठरते हे पाहावे लागणार आहे.
